भारतावर दडपण टाकण्यासाठी चीनच्या नव्या कारवाया

नवी दिल्ली – भारताच्या सीमेजवळील क्षेत्रात चीन नवे गाव वसवून भारतावर दडपण टाकण्याची तयारी करीत आहे. नेपाळ, भूतानच्या सीमेवर चीनने यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अरुणाचल प्रदेशजवळील एलएसीजवळील क्षेत्रातही चीन गाव वसवून त्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारताचे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी अरुणाचल प्रदेशच्या एलएसीला भेट दिली. इथल्या सुरक्षेचा आढावा घेऊन लष्करप्रमुखांनी चिनी लष्करावर करडी नजर ठेवण्याचे आदेश सैन्याला दिले. त्याचवेळी भारतीय सैन्याच्या गस्त व सतर्कतेचेही लष्करप्रमुखांनी विशेष कौतुक केले आहे.

भारतावर दडपण टाकण्यासाठी चीनच्या नव्या कारवाया‘तिबेट सिन्स 1951: लिबरेशन, डेव्हलपमेंट अँड प्रॉस्पॅरिटी’ नावाचे श्‍वेतपत्रक चीनने प्रसिद्ध केले आहे. यात अरुणाचल प्रदेशच्या एलएसीजवळ असलेल्या तिबेटच्या ‘ल्हूम्झे’ प्रांतात गाव विकसित करण्याचा उल्लेख आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या भागात गाव उभारून इथल्या चीनच्या भूमीचे रक्षण करण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला केली होती. या श्‍वेतपत्रकामुळे ही बाब समोर आली आहे. त्याचवेळी भारतावर दडपण वाढविण्यासाठीच चीन या हालचाली करीत असल्याचे उघड होत आहे. एलएसीजवळ लोकवस्ती वाढवून चीन यावरील आपला दावा अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

अरुणाचल प्रदेशच्या एलएसीपासून जवळच असलेल्या लोंगिऊ भागातही चीन नवे गाव उभारत आहे. तसेच इथून जवळच चीन चार विमानतळ उभारण्याची तयारी करीत आहे. हा चीनच्या भारतविरोधी डावपेचांचा भाग ठरतो. याची गंभीर दखल भारताने घेतली आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी अरुणाचल प्रदेशच्या एलएसीला भेट देऊन इथल्या सुरक्षेचा आढावा घेतला. लडाखच्या एलएसीवर चीनच्या लष्कराने भारतीय सैन्यावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करून पाहिला. यात अपयश आल्यानंतर चीन एलएसीच्या इतर भागांमध्ये घुसखोरी करून तणाव माजविण्याचा प्रयत्न करील, अशी दाट शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे भारतीय सैन्याकडून याबाबत अधिक सावधानता दाखविली जात आहे.

जनरल नरवणे यांनी अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर तैनात असलेल्या सैन्याधिकार्‍यांची गस्त व सावधपणाची प्रशंसा केली. त्याचवेळी चीनच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्याची सूचनाही लष्करप्रमुखांनी केली आहे. दरम्यान, चीनच्या या हालचालींमधून भारतावर दडपण टाकण्याची अत्यंतिक गरज स्पष्ट होत आहे. तिबेटच्या भूभागात चीनच्या लष्करी हालचालींची तीव्रता वाढत चालली आहे. याकडेही भारत अत्यंत सावधपणे पाहतो आहे. गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारतीय लष्कराचे सामर्थ्य व आपल्या जवानांच्या मर्यादा चीनच्या लक्षात आल्या आहेत. म्हणूनच चीन लडाखच्या हवामानाची सवय असलेल्या तिबेटी तरुणांची आपल्या लष्करात भरती करीत आहे. याद्वारे चीन भारताबरोबरच्या पुढच्या संघर्षाची तयारी करीत असल्याचे दिसते. त्याचवेळी सध्या चीनच्या लष्कराकडे भारताशी उघडपणे टक्कर घेण्याची क्षमता नाही, हे देखील चीनने याद्वारे अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे दिसते.

leave a reply