असंतोषाचा उद्रेक होऊन पाकिस्तानात गृहयुद्ध पेट घेईल

- विख्यात पत्रकाराचा निष्कर्ष

इस्लामाबाद – इस्रायल आणि हमासमध्ये झालेल्या संघर्षात पाकिस्तानने अत्यंत महत्त्वाची भूमिका स्वीकारून पॅलेस्टिनींची बाजू मांडली. त्याचा फार मोठा प्रभाव पडल्याचा दावा करून पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी आपल्या पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. या देशाचे सरकार अशा कैफात बुडालेले असताना, पाकिस्तानसमोर अस्तित्त्वाचे संकट खडे ठाकले आहे. प्रचंड आर्थिक विषमता, अन्याय, भ्रष्टाचार व गैरव्यवहाराने बरबटलेले प्रशासन आणि गरीबी याचा विस्फोट होऊन पाकिस्तानात गृहयुद्ध पेट घेईल का? असा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार विचारत आहेत.

असंतोषाचा उद्रेक होऊन पाकिस्तानात गृहयुद्ध पेट घेईल - विख्यात पत्रकाराचा निष्कर्षविख्यात पत्रकार इरफान राजा यांनी पाकिस्तानात गृहयुद्ध पेट घेईल का? असा प्रश्‍न असलेले शीर्षक असलेला लेख लिहिला आहे. एशिया टाईम्ससाठी लिहिलेल्या या लेखात इरफान राजा यांनी पाकिस्तानातील आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीचा हवाला दिला. स्थापना झाल्यापासूनच पाकिस्तान लोकशाही व्यवस्था विकसित करू शकला नाही की कट्टर राजवटीच्या दिशेनेही या देशाचा प्रवास झाला नाही. यामुळे पाकिस्तानात कायम राजकीय अस्थैर्य राहिले. त्यातच भ्रष्टाचार व अकार्यक्षम प्रशासनाचा गैरव्यवहार यामुळे पाकिस्तानची जनता जेरीस आलेली आहे. भ्रष्ट नेते, सरकारी व लष्करी अधिकारी यांची संपत्ती प्रचंड प्रमाणात वाढत असताना, सर्वसामान्य जनता मात्र भयंकर आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक विषमता वाढत चालली आहे. ही विषमता आणि अन्याय यामुळे पाकिस्तानी समाजात असंतोष खदखदत आहे आणि त्याचा उद्रेक होऊ शकतो, याकडे राजा यांनी लक्ष वेधले.

बलोच नेते अकबर बुग्ती यांची हत्या घडविणारे व पाकिस्तानच्या लाल मशिदीत लष्करी कारवाई करणारे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ सध्या दुसर्‍या देशात विलासी जीवन जगत आहेत. तर त्यांच्या निर्णयाचे परिणाम मात्र सर्वसामान्य पाकिस्तानी जनता भोगत आहे, या विरोधाभासावर इरफान राजा यांनी बोट ठेवले. पश्तू, बलोच, भारतातून पाकिस्तानात गेलेले मोहाजिर यांच्या वैध अस्मिता जपण्याचे सोडून पाकिस्तान या समुदायांना आव्हान देत आहे. एकेकाळी पाकिस्तानचाच भाग असलेल्या पूर्व पाकिस्तानमध्ये असाच सामाजिक व राजकीय संघर्ष पेटला आणि पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेशची निर्मिती झाली होती, याची आठवण राजा यांनी करून दिली. त्याचवेळी पाकिस्तानात गृहयुद्ध पेटले तर भारत ते शमविण्यासाठी पाकिस्तानला सहाय्य करील की पाकिस्तानचे आणखी तुकडे व्हावे, यासाठी प्रयत्न करील, असा स्वतंत्र प्रश्‍नही इरफान राजा यांनी उपस्थित केला आहे.

भारतीय विश्‍लेषकांचा दाखला देऊन राजा यांनी पाकिस्तानात अशी स्थिती उद्भवली तर भारत पाकिस्तानचे तुकडे पाडण्यासाठीच प्रयत्न करील, असा निष्कर्ष नोंदविला आहे. पाकिस्तानात न्यायाचे राज्य आणण्याचे आश्‍वासन देऊन इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आले खरे. पण सध्या पाकिस्तान माफियांकडूनच चालविला जात आहे. इम्रान खान यांच्या सरकारला प्रशासन हाताळणे अजिबात जमलेले नाही. हे दारूण अपयश पाकिस्तानी समाजाला अधिकाधिक निराश करीत चालले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे रुपांतर असहिष्णू, असहनशील समाजात झाले आहे, असा दावा इरफान राजा यांनी केला.

गरीब व पीडितांना न्याय नाकारला जाणे, श्रीमंत व प्रभावी असलेल्या वर्गाचे गुन्हे माफ करणे, यामुळे पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. अशा परिस्थितीत भीषण परिणाम घडविणारे गृहयुद्ध हेच पाकिस्तानचे भवितव्य ठरते, असा निष्कर्षाप्रत इरफान रजा आले आहेत. हे गृहयुद्ध पेटले की ते संपविणे अवघड बनेल, असा इशाराही इरफान राजा यांनी दिला आहे.

leave a reply