चीनची नवी क्षेपणास्त्रे शत्रूची लष्करी यंत्रणा निकामी करतील

- चीनच्या लष्करी विश्‍लेषकांचा दावा

लष्करी यंत्रणाबीजिंग – बहुस्तरीय हवाई सुरक्षा यंत्रणा भेदून शत्रूची लष्करी आणि दळणवळण यंत्रणा नष्ट करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चीनने चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राद्वारे महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करून शत्रूची व्यवस्था खिळखिळी करता येतील, असा दावा चीनच्या लष्कराने केला. तर ही क्षेपणास्त्रे अमेरिका, जपान किंवा तैवानसाठी इशारा असल्याचे चिनी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी रॉकेट फोर्स’ने दोन दिवसांपूर्वी वायव्य भागात दोन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. त्वरित प्रतिसाद देण्याच्या सरावाअंतर्गत घेतलेली ही चाचणी यशस्वी ठरल्याचे चीनच्या लष्कराने सांगितले. या क्षेपणास्त्रांची नावे किंवा तपशील चीनने जाहीर केले नाही. पण या क्षेपणास्त्रांमुळे शत्रूकडून केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेपावर मात करून शत्रूची मोक्याची ठिकाणे नष्ट करणे सोपे होईल, असा दावा चीनच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला.

बहुस्तरीय हवाई सुरक्षा यंत्रणा भेदून शेकडो किलोमीटर अंतरावरील शत्रूचे तळ नष्ट करण्यात ही क्षेपणास्त्रे यशस्वी ठरली. शत्रूची लष्करी आणि दळणवळण यंत्रणा या क्षेपणास्त्राने निकामी केल्याची माहिती चिनी वृत्तवाहिनीने दिली. त्याचबरोबर चीनच्या लष्कराशी संलग्न असलेल्या विश्‍लेषकांनी या क्षेपणास्त्र चाचणीचे महत्त्व व अमेरिका, तैवानला दिलेला इशारा या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केला.

गेल्या आठवड्यात तैवानच्या सागरी क्षेत्राजवळ चीनच्या लष्कराचा हवाई आणि सागरी सराव पार पडला होता. ‘तैवान इंडिपेंडन्स फोर्सेस’च्या चिथावणीखोर कारवायांना उत्तर देण्यासाठी हा सराव आयोजित केला होता. त्याचा पुढचा टप्पा म्हणून या दोन्ही क्षेपणास्त्र चाचण्यांकडे पाहिले जाते, असे वू शाओमिन यांनी बजावले.

‘तैवान ते साऊथ चायना सी यांच्यासारख्या चीनच्या अंतर्गत मुद्यांमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप केला तर चीनचे लष्कर जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्ण सज्ज आहे, हे दाखवून देण्यासाठी हा सराव होता. यामुळे फक्त शत्रूची लष्करी व दळणवळण यंत्रणा नष्ट होणार नाही, तर भविष्यातील युद्धात चीनचाच विजय होईल, हे या चाचणीमुळे सिद्ध झाले आहे’, असा इशारा चीनच्या लष्कराशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिला.

ही क्षेपणास्त्रे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक शस्त्र असल्याचा दावा या अधिकाऱ्याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर केला. चीनच्या विश्‍लेषकांनी थेट उल्लेख केला नसला तरी, तैवानच्या सुरक्षेसाठी इशिगाकी बेटाजवळ क्षेपणास्त्रे तैनात करणाऱ्या जपानसाठी देखील हा इशारा असल्याचा दावा चिनी माध्यमे करीत आहेत. इशिगाकी व्यतिरिक्त तैवानपासून अवघ्या 110 किलोमीटर्स अंतरावर असणाऱ्या योनागुनी बेटावर ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिट’ तैनात करण्यावरही जपान विचार करीत आहे. त्यामुळे ही क्षेपणास्त्र चाचणी घेऊन चीनने जपानला धमकावण्याचा प्रयत्न केल्याची दाट शक्यता समोर येत आहे.

दरम्यान, चीनने क्षेपणास्त्रांनी सज्ज सायलोज्‌ अर्थात खंदक तयार केल्याची माहिती काही आठवड्यांपूर्वी समोर आली होती. त्याचा दाखला देऊन अमेरिकेच्या लष्करी विश्‍लेषकांनी चीन युद्धाची तयारी करीत असल्याचा आरोप केला होता.

leave a reply