नॉर्दन अलायन्सने 300 तालिबानी ठार केल्याचा दावा

- पंजशीरमध्ये संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता

300 तालिबानीकाबुल – तालिबानचे दहशतवादी आणि नॉर्दन अलायन्स यांच्यात भडकलेल्या संघर्षात किमान 300 तालिबानी ठार झाल्याचा दावा केला जातो. पंजशीर-कपिसा सीमेवर हा संघर्ष भडकल्याचे बोलले जाते. नॉर्दन अलायन्सने तालिबानच्या वाहनावर बॉम्ब हल्ले चढविल्याचे व्हिडिओज्‌ समोर येत आहेत. त्यामुळे पंजशीरसाठी नॉर्दन अलायन्स आणि तालिबानमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जाते. मात्र याबाबत वेगवेगळ्या माध्यमांमधून समोर येत असलेल्या माहितीला अधिकृतरित्या कुणीही दुजोरा दिलेला नाही.

पंजशीर वगळता अफगाणिस्तानच्या जवळपास सर्व प्रांतांवर तालिबानने ताबा मिळविला आहे. पण अफगाणिस्तानातील सर्वात लहान प्रांत म्हणून ओळखण्यात येणारा पंजशीरवर तालिबानला नियंत्रण मिळविणे जमलेले नाही. पंजशीरचे नेतृत्व अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद याच्याकडे आहे. तर अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह देखील पंजशीरमध्येच असल्याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ समोर आले आहेत. पंजशीरमधूनच तालिबानच्या विरोधात संघर्ष करणार असल्याची घोषणा सालेह व मसूद यांनी केली.

यानंतर अफगाणी लष्कराचे ताफे, तसेच तालिबानविरोधी गट रणगाडे, लष्करी वाहने घेऊन पंजशीरमध्ये जमा होऊ लागल्याच्या बातम्या व व्हिडिओ प्रसिद्ध झाले होते. तर तालिबानचे दहशतवादी देखील पंजशीरच्या दिशेने रवाना झाले होते. तालिबानच्या हल्ल्यांसमोर सालेह-मसूद यांची नॉर्दन अलायन्स फार काळ टिकणार नाही, असा प्रचार पाकिस्तानी माध्यमांनी सुरू केला आहे.

तालिबानची ताकद पाहून मसूद यांनी रशियाच्या मध्यस्थीने तालिबानबरोबर चर्चा सुरू केल्याच्या बातम्याही पाकिस्तानी माध्यमांनी सोडल्या होत्या. ‘मला माझ्या वडिलांकडून तालिबानविरोधात संघर्ष करण्याचा वारसा मिळाला असून तो मी सोडून देणार नाही’, असे अहमद मसूद यांनी जाहीर केले आहे. यानंतर कपिसा प्रांताच्या सीमेजवळ असलेल्या पंजशीरच्या अंद्राब भागात नॉर्दन अलायन्स व तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये संघर्ष भडकल्याच्या बातम्या आल्या.

या संघर्षात तालिबानचे 300 दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला जातो. तालिबानच्या वाहनावर झालेला बॉम्ब हल्ला व यात ठार झालेल्या तालिबानी दहशतवाद्यांचे मृतदेह व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या माहितीला अधिकृतरित्या कुणीही दुजोरा दिलेला नाही. वीस वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबानची राजवट असतानाही, पंजशीरचा ताबा घेणे तालिबानला जमले नव्हते. त्यामुळे पंजशीरच्या परिस्थितीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, हजारो नागरिक अडकून पडलेल्या काबुल विमानतळावरील परिस्थिती अधिकच बिकट बनल्याचा दावा केला जातो. सोमवारी काबुल विमानतळाच्या सुरक्षेसाठी तैनात अमेरिका व जर्मन लष्कराबरोबर अफगाणी जवानांमध्ये झालेल्या संघर्षात एका अफगाणी जवानाचा बळी गेला. जर्मनीच्या लष्कराने याची माहिती दिली. काबुल विमानतळाच्या बाहेरील सुरक्षा तालिबानच्या हाती आहे. तर विमानतळावर अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांच्या लष्कराचे नियंत्रण असून इथे काही अफगाणी जवानही तैनात असल्याचे सांगितले जाते.

leave a reply