भारत-अमेरिकेच्या लष्करामधील संयुक्त युद्धसरावावर चीनचा आक्षेप

joint exerciseबीजिंग – भारत आणि अमेरिकेचे लष्कर उत्तराखंडमध्ये करीत असलेल्या युद्धसरावावर चीनने आक्षेप घेतला आहे. चीनच्या सीमेपासून १०० किलोमीटर अंतरावर सुरू असलेला हा युद्धसराव भारताने चीनबरोबर केलेल्या सीमाकरारांचे उल्लंघन करणारा असल्याचा दावा चीनने केला. इतकेच नाही तर भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करता कामा नये, असा इशाराही चीनने दिला आहे. भारत आणि चीनच्या सीमावादावर अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने प्रसिद्ध केलेल्या अहवालावर चीनची ही प्रतिक्रिया आली आहे.

भारत व अमेरिकेच्या लष्करामध्ये ‘युद्ध अभ्यास’ सुरू आहे. चीनच्या सीमेपासून १०० किलोमीटर अंतरावरील या लष्करी सरावावर चीनने आक्षेप नोंदविला आहे. १९९३ आणि १९९६ साली भारताने चीनबरोबर केलेल्या सीमाकरारांचे उल्लंघन या सरावामुळे होत असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. हा सराव भारत व चीनचा परस्परांवरील विश्वास वाढविणारा नाही, असा शेरा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी मारला. याबरोबरच झाओ लिजियान यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अमेरिकेला इशारे दिले आहेत.

Inida-US Practice२०२० सालच्या मे महिन्यापासून लडाखच्या एलएसीवर भारत व चीनच्या लष्करामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. गलवानमधील संघर्षानंतर हा तणाव प्रचंड प्रमाणात वाढला व आजही हा तणाव निवळलेला नाही. भारत व चीनने सीमेवर मोठ्या प्रमाणात तैनाती केली आहे. तसेच आपला भूभाग बळकावण्याचा आरोप दोन्ही देशांकडून सुरू असून भारत व चीन यापैकी कुणीही इथून माघार घ्यायला तयार नाही. दोन्ही देश सैन्य माघारी घेण्याचे आवाहन एकमेकांना करीत आहेत, पण त्यासाठी पुढाकार घेण्याचे टाळत आहेत. हा वाद सोडविण्यासाठी उभय देशांमध्ये सुरू असलेल्या चर्चेलाही फारसे यश मिळालेले नाही, असा दावा करणारा अहवाल अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने प्रसिद्ध केला आहे.

या अहवालावर चीनने खरमरीत टीका केली असून परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी भारत व चीनच्या संबंधांमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही, असा शेरा मारला आहे. भारत व चीनचे संबंध विकोपाला जावे यासाठी अमेरिका प्रयत्न करीत असून याद्वारे आपला स्वार्थ साधण्याच्या तयारीत असल्याचा ठपका लिजिआन यांनी ठेवला. मात्र भारत व चीनकडे हा सीमावाद सोडविण्याची इच्छा आणि क्षमता आहे. यात अमेरिकेने दखल देऊ नये. त्यापेक्षा या क्षेत्रात शांतता व स्थैर्य कायम राखण्यासाठी अमेरिकेला बरेच काही करता येऊ शकेल, असा टोला लिजिआन यांनी लगावला. अमेरिकेवर ही टीका करीत असताना, भारताबरोबरील सीमावाद सामोपचाराने सोडविण्यासाठी चीन प्रयत्न करीत असल्याचा दावा लिजिआन यांनी केला आहे.

भारत व अमेरिकेच्या लष्करामधील संयुक्त युद्धसरावामुळे चीन अस्वस्थ झाल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या या टीकेतून उघड होत आहे. भारत व चीनमधील सीमावादाचा लाभ घेऊन अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश चीनला घेरण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका याआधीही चीनने केली होती. तसेच भारताने सीमावादावरील चर्चा कायम ठेवून चीनबरोबर राजनैतिक तसेच व्यापारी सहकार्य करीत रहावे, अशी अपेक्षाही चीनने व्यक्त केली होती. पण भारताने चीनची ही मागणी धुडकावून लावली. जोवर चीन लडाखच्या एलएसीवरील आपले लष्कर माघारी घेत नाही, तोवर भारताबरोबरील संबंध सुरळीत होण्याची अपेक्षा चीनला ठेवता येणार नाही, याची जाणीव भारत सातत्याने करून देत आहे. तसेच पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनांवरील सुरक्षा परिषदेची कारवाई रोखून चीनने भारतला सातत्याने चिथावणी देत आहे. याचीही गंभीर दखल भारताने घेतली असून याची किंमत चीनला चुकती करावी लागेल, असे इशारे भारताकडून दिले जात आहेत.

leave a reply