तैवानवर हल्ल्याच्या चीनच्या योजनेचा गौप्यस्फोट करणारा ऑडिओ लीक

ऑडिओवॉशिंग्टन – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानवर हल्ल्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात चीनच्या लष्कराचे जवळपास दीड लाख जवान आणि 953 जहाजे तैवानवर हल्ला चढवतील. तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख जवान तैवान जिंकण्यासाठी रवाना केले जातील, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना आणि चीनच्या लष्करामध्ये पार पडलेल्या बैठकीत तैवानवरील हल्ल्याबाबत ही चर्चा झाली. या बैठकीचा ऑडिओ सोशल मीडियात लीक झाला आहे. जिनपिंग यांच्या राजवटीवर नाराज असलेले कम्युनिस्ट पार्टीतील सदस्य तसेच लष्करातील काही अधिकाऱ्यांनी जाणुनबुजून ही ऑडिओ क्लिप लीक केल्याचा संशय व्यक्त केला जातो.

14 मे रोजी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आणि पिपल्स लिबरेशन आर्मीवर प्रभाव असलेल्या ‘ग्वांगदाँग मिलिटरी रिजन’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. चिनी सोशल मीडियावर या बैठकीतील तासाभराची ऑडिओ प्रसिद्ध केली. तर चीनमधून पलायन केलेल्या आणि अमेरिकेमध्ये आश्रय घेतलेल्या जेनिफर झेंग यांनी सोशल मीडियावर ही क्लिप शेअर करून खळबळ माजविली. यातील माहिती खरी असल्याचा दावा लष्करी विश्लेषक करीत आहेत.

दहा दिवसांपूर्वी कम्युनिस्ट पार्टी व लष्करामध्ये ‘ग्वांगदाँग डीव्हाय-2022′ असे या बैठकीला नाव देण्यात आले होते. डीव्हाय म्हणजे डाँग युआन अर्थात ग्वांगदाँग येथील लष्करी हालचाली, असा याचा अर्थ होतो. राजधानी बीजिंगप्रमाणे अतिमहत्त्वाच्या असलेल्या ‘पर्ल रिव्हर डेल्टा’ भागाच्या सुरक्षेबाबत यावेळी चर्चा झाली.

ऑडिओपर्ल रिव्हर डेल्टा हा भाग ग्वांगदाँग प्रांतामध्ये येतो. मोठी लोकवस्ती असलेला सदर भाग चिनी उद्योगक्षेत्राचे केंद्र मानले जाते. चीनला जगाची कार्यशाळा बनविण्यामागे या भागाचा मोठा वाटा असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर चीनमधील व्यापार केंद्र ग्वांगझाऊ, तर हुवेई, टेंसेंट या आघाडीच्या कंपन्यांचे मुख्यालय असलेले शेंझेनसारखे हाय-टेक शहर, याच भागात येतात. हाँगकाँग, मकाऊ, डॉन्गून, झाँगशॅन, फोशॅन अशी महत्त्वाची शहरे देखील याच पर्ल रिव्हर डेल्टा भागात येतात.

एकूणच चीनच्या आर्थिक आणि व्यापारी नाड्या गाँगदाँग प्रांतामध्ये एकवटलेल्या आहेत. या प्रांताची सुरक्षा निश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लष्करी हालचाल करण्याचे कम्युनिस्ट पार्टी व लष्कराच्या बैठकीत निश्चित झाले. सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षात घेता तैवानवर हल्ला चढविण्यासाठी ही योग्य वेळ आहे, यावर या बैठकीत एकमत झाले. मात्र तैवानवर हल्ला चढविण्याआधी चीनने आवश्यक ती पूर्वतयारी करायला हवी, यावरही या बैठकीत सहमती झाली.

चीनने तैवानवर दोन टप्प्यात हल्ला चढविण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात एक लाख 40 हजार जवान, 953 जहाजे, 1,653 मानवरहीत वाहनांचा समावेश असेल, असे या लीक झालेल्या ऑडिओतून उघड झाले. तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख जवान तैवानमध्ये घुसून ताबा घेतील, अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीत ग्वांगदाँग लष्करी भागाचे कमांडर मेजर जनरल झाऊ हे तसेच या भागाचे कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ अधिकारी वँग शोसिन उपस्थित होते.

गेल्या सात दशकांच्या इतिहासात चीनची कम्युनिस्ट राजवट आणि लष्करातील अधिकाऱ्यांमधील बैठकीचे संदर्भ कधीही अशाप्रकारे प्रसिद्ध झाले नव्हते. पहिल्यांदाच एक तासाच्या बैठकीचा पूर्ण ऑडिओ लीक झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विश्लेषक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या बैठकीत सहभागी झालेल्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते तसेच लष्करी अधिकाऱ्यांनीच हा ऑडिओ लीक केल्याची शक्यता विश्लेषक वर्तवित आहेत. त्यामागे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या विरोधातील असंतोषाची भावना असू शकते, असा दावा काही विश्लेषकांनी केला आहे. दरम्यान, चीनने हल्ला चढविल्यास तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिका लष्कर तैनात करील, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली होती. पण चीनने गंभीर परिणामांचा इशारा दिल्यानंतर पेंटॅगॉनला राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या विधानावर खुलासा देणे भाग पडले होते. अमेरिका आपल्या वन चायना पॉलिसीवर ठाम असल्याचे सांगून अमेरिका तैवानच्या सुरक्षेसाठी थेट लष्करी सहभाग घेणार नसल्याचे पेंटॅगॉनने स्पष्ट केले. त्यामुळे बायडेन प्रशासनाने चीनविरोधी संघर्षात तैवानला एकटे पाडल्याची टीका अमेरिकेत केली जात आहे. याआधी जपानच्या माजी पंतप्रधानांनी बायडेन प्रशासनाचे तैवानविषयक धोरण धरसोडीचे असल्याचा ठपकाठेवला होता.

leave a reply