साऊथ चायना सी क्षेत्रात चीनला आव्हान देण्यासाठी फिलिपाईन्स मार्कर्स उभारणार

मनिला – साऊथ चायना सी क्षेत्रात आक्रमक झालेल्या चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी फिलिपाईन्सने मोठी पावले उचलली आहेत. या सागरी क्षेत्रावरील आपली दावेदारी निश्चित करण्यासाठी फिलिपाईन्सने मार्कर्स तसेच सुरक्षा चौक्या उभारण्यास सुरुवात केली आहे. स्पार्टले द्वीप समूहांच्या पाच वादग्रस्त बेटाजवळ फिलिपाइन्सच्या या कारवाया चीनसाठी आव्हान ठरत आहेत. अमेरिका आणि असियान सदस्य देशांमध्ये झालेल्या बैठकीनंतर फिलिपाईन्सची ही भूमिका लक्षवेधी ठरते.

challenge-Chinaफिलिपाइन्सच्या तटरक्षकदलाने 12 ते 14 मे या दरम्यान आपल्या सागरी क्षेत्रात पाच ठिकाणी मार्कर्स उभारले आहेत. फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाचे प्रमुख ॲडमिरल आर्टीमीओ अबू यांनी ही माहिती दिली. लवाक, वेस्ट यॉर्क, परोला आणि थिटू आयलंड या ठिकाणी हे मार्कर्स उभारण्यात आले आहेत. हे मार्कर्स नेव्हिगेशनसाठी तसेच सागरी वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी सहाय्यक ठरणार आहेत. स्पेनमध्ये तयार करण्यात आलेले हे मार्कर्स सॅटेलाइटशी जोडलेले असल्याचा दावा केला जातो.

याबरोबरच फिलिपाईन्सच्या तटरक्षकदलाने लवाक, परोला आणि वेस्ट यॉर्क या बेटांवर सागरी सुरक्षा चौक्या देखील उभारल्या आहेत. ही पूर्ण तैनाती फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात करण्यात आली असून यामुळे आपल्या देशाच्या धोरणात्मक सागरी सुरक्षेत वाढ होईल, असा दावा ॲडमिरल अबू यांनी केला. तटरक्षक दलाने घेतलेल्या या निर्णयाचे फिलिपाईन्समधून स्वागत होत आहे. फिलिपाइन्सच्या सागरी क्षेत्रावर हक्क सांगणाऱ्या चीनसाठी हा मोठा हादरा असल्याचा दावा या देशाचे माजी लष्करी अधिकारी व विश्लेषक करीत आहेत.

south-china-seaसाऊथ चायना सीच्या जवळपास 90 टक्के सागरी क्षेत्रावर चीन आपला अधिकार सांगत आहे. फिलिपाईन्स, व्हिएतनाम, तैवान, ब्रूनेई आणि मलेशिया या देशांचे दावेदेखील चीनला मान्य नाहीत. त्याचबरोबर आग्नेय आशियाई देशांच्या तटरक्षकदल किंवा नौदलाच्या साऊथ चायना सीमधील हालचालींवर चीनने याआधी कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वी चीनच्या नौदलाने फिलिपाईन्सच्या तटरक्षकदलाच्या बोटींचा मार्ग रोखला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चीनच्या तटरक्षक दलाने फिलिपाईन्सच्या जहाजांवर पाण्याचा जोरदार मारा केला होता. त्याआधी चीनच्या चारशेहून अधिक मच्छिमार नौकांनी फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत तळ ठोकला होता.

leave a reply