चीनकडून भारताला साडेसहा लाख मेडिकल किट्स

नवी दिल्ली – चीनकडून भारताला ६.५० लाख मेडिकल किट्स पुरविल्या जात आहेत. याचा भारतीयांनी धसका घेतला असून त्यांचा दर्जा तपासण्याची मागणी होत आहे. कारण याआधी चीनने ब्रिटन, स्पेन, नेदरलँड आणि इटलीला सदोष टेस्टिंग किट्स दिल्याचे उघड झाले होते. तसेच चीनने भारताला दिलेली ‘पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंटस्’ (पीपीई) देखील निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले होते. कोरोनाव्हायरसचा उगम झालेल्या चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाव्हायरस संदर्भातल्या मेडिकल किट्सचे उत्पादन होते. म्हणून बहुतांश देशांनी चीनकडून या किट्स खरेदी केल्या. पण हे साहित्य सदोष असल्याचे समोर आले होते. भारताने चीनकडून मोठ्या प्रमाणात मेडिकल किट्स खरेदी केल्या आहेत. यातली पहिली खेप गुरुवारी भारतात येत आहे.

६ .५० लाख मेडिकल किट्समध्ये ‘रॅपिड अँन्टी बॉडी टेस्ट्स’ आणि ‘आरएनए एक्सट्राक्शन किट्स’ चा समावेश आहे. या रॅपिड टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाव्हायरसच्या चाचणीचे निदान होईल, असा दावा केला जातो. आपल्या देशातल्या कोरोनाव्हायरसच्या रेड झोनमध्ये ही टेस्ट प्रभावी ठरेल, असे सांगितले जाते. तर पुढच्या १५ दिवसात चीनमधून आणखी २० लाख किट्स भारतात येणार आहेत.

दरम्यान, भारतात चीनने एक लाख ७० हजार ‘पीपीई’ पाठविले होते. भारत सरकारने ही खरेदी केली नव्हती. तर भारताला हे सदिच्छाच्या स्वरूपात मिळाले होते. चीनकडून आलेल्या या पीपीईची चाचणी केली असता ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. यातील ५० हजार पीपीई वापरण्याच्याही दर्जाची नसल्याचे उघड झाले आहे. तर भारताने चीनला १५ लाख पीपीईची ऑर्डर दिली होती.

चीनकडून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सहाय्यावर भारतीयांनी चिंता व्यक्त केली आहे. आता मेड इन चायनावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. याआधी चीनने ब्रिटन, स्पेन, नेदरलँड या देशांना सदोष किट्स पुरविली होती. संतापलेल्या ब्रिटनने या किट्स चीनला परत पाठवून आमचे पैसे परत करा, अशी मागणी केली होती. भारतावर ही अशी वेळ ओढावेल काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

leave a reply