अरुणाचल प्रदेशमध्ये व्यूहरचनात्मक दृष्ट्या महत्वाच्या पुलाची उभारणी

नवी दिल्ली,  (वृत्तसंस्था) –   अरुणाचल प्रदेशच्या सुबानसिरी जिल्ह्यात सामरिकदृष्ट्या महत्वाचा असलेला पूल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) बांधून पूर्ण केला.  सामरिक सज्जतेच्या दृष्टीने भारत-चीन सीमेवर रस्ते, रेल्वेचे  जाळे उभारण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. बीआरओने बांधलेला हा पूल सीमेनजीक काम सुरु असलेल्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक ठरतो.

सुबानसिरी जिल्ह्यातील  सुबानसिरी नदीवर “बीआरओ’ तर्फे ४६०  फूट लांबीचा “बॅली ब्रीज ‘ उभारण्यात आला आहे. सध्या अस्तित्त्वात असलेला पूल जीर्ण झाला असल्याने “बीआरओ’ तर्फे नवींन पुलाची उभारणी करण्यात आली. चीन सीमेवर असलेल्या जवानांचा सीमेवरील ४५१ गावांशी संपर्क करण्यासाठी हा पूल एकमेव साधन आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असून चार दिवसात हा पूल वाहतुकीसाठी  खुला करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सामरिकसज्जतेच्या दृष्टीने सीमेवर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकारकडून प्राधान्य देण्यात येत आहे.  दोन वर्षांपूर्वीच सुबानसिरी जिल्ह्यात रस्ता तयार करण्यात आला होता. चीनने  आपल्या क्षेत्रात पायाभूत  सुविधां मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. चीनने भारतीय सीमेपर्यंत रस्ते व रेल्वेचे जाळे उभारले आहे . यासह हवाईतळांची देखील उभारणी केली आहे. चीनची सीमेवरील तयारी पाहता भविष्यात भारतासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.  यापार्श्वभूमीवर भारतही सीमा क्षेत्रात रस्ते आणि रेल्वेचे जाळे बांधत आहे.

leave a reply