जपानच्या सागरी क्षेत्राजवळ चीन-रशियाच्या नौदलाचा सराव

चीन-रशियाच्याबीजिंग/मॉस्को – ईस्ट चायना सीच्या क्षेत्रात, जपानच्या सागरीहद्दीजवळ चीन व रशियाच्या युद्धनौकांचा मोठा सराव बुधवारपासून सुरू होईल. या क्षेत्रासह जागतिक पातळीवरील धोक्यांचा सामना करण्याच्या उद्देशाने या सरावाचे आयोजन केल्याची घोषणा चीनच्या संरक्षण मंत्रालयाने केली. थेट उल्लेख टाळून चीनने अमेरिका आणि जपानला उद्देशून हा इशारा दिल्याचे दिसत आहे. चीन-रशियाच्या या युद्धसरावाआधी जपानने आपला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण खर्च घोषित केला होता.

चीनच्या लष्करातील ‘ईस्टर्न थिएटर कमांड’ने दोन्ही देशांमधील नौदल सरावाची माहिती जाहीर केली. बुधवारी चीनच्या शांघायपासून हा युद्धसराव सुरू होणार असून पुढच्या आठवड्यातील गुरुवारपर्यंत हा सराव चालणार आहे. ‘मेरिटाईम कोऑपरेशन २०२२’ असे या सरावाचे नाव असून यामध्ये दोन्ही देशांच्या आघाडीच्या युद्धनौका सहभागी होतील, अशी माहिती चीनने दिली. रशियाची क्षेपणास्त्र यंत्रणेने सज्ज असलेली ‘वरयाग’ युद्धनौका तसेच तीन विध्वंसिकांचा यात समावेश असेल. तर चीनने आपल्या युद्धनौकांची नावे जाहीर केलेली नाही. पण यामध्ये दोन विनाशिका, दोन गस्तीनौका, डिझेलवर चालणारी पाणबुडी आणि बहुद्देशीय सहाय्यक जहाज यात सामील होतील, अशी माहिती चीनने दिली.

दोन्ही देशांमधील नौदल सहकार्य वाढविण्यासाठी आणि एशिया-पॅसिफिकमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी या सरावाचा वापर होईल, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी युद्धनौकांवरील क्षेपणास्त्रे व विमानभेदी तोफांचा वापर करून हवाई लक्ष्य भेदण्याचा सराव केला जाईल. त्याचबरोबर विनाशिका व पाणबुडीविरोधी युद्धाची तयारी यानिमित्ताने केली जाणार असल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केेले. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे या क्षेत्रात तणाव निर्माण झालेला असताना चीन व रशियन नौदलाचा सराव यात भर टाकणारा ठरतो, अशी टीका अमेरिकी पत्रकार करीत आहेत.

युक्रेनबरोबरचे युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने चीनच्या नौदलाबरोबर केलेला हा दुसरा युद्धसराव ठरतो. काही आठवड्यांपूर्वीच रशिया व चीनच्या युद्धनौकांचा सराव पार पडला होता. कुरिल बेटांजवळ पार पडलेल्या युद्धसरावाची पाहणी करण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन उपस्थित होते. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका व युरोपिय देशांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांवर रशियाविरोधात भूमिका घेण्यासाठी दबाव टाकला आहे. अशा परिस्थितीत, रशियाने चीनबरोबर सलग दुसरा सराव आयोजित करून पाश्चिमात्य देशांना इशारा दिल्याचे चिनी व आखाती माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply