नौदलाला स्कॉर्पिन श्रेणीतील ‘वागीर’ पाणबुडी मिळाली

स्कॉर्पिन श्रेणीतीलनवी दिल्ली – ‘प्रोजेक्ट-७५’च्या अंतर्गत तयार केल्या जात असलेल्या स्कॉर्पिन श्रेणीतील सहा पाणबुड्यांपैकी पाचवी पाणबुडी वागीर नौदलाला मिळाली आहे. १ फेब्रुवारीपासून वागीरच्या चाचण्या सुरू झाल्या होत्या. यामध्ये वागीरवरील शस्त्रास्त्रे व सेन्सर्सच्या चाचण्यांचाही समावेश होता. इतर पाणबुड्यांच्या तुलनेत वागीरच्या या चाचणी कमी वेळेत पूर्ण झाल्याचे सांगून नौदलाने त्यावर समाधान व्यक्त केले आहे. यामुळे पुढच्या महिन्यातच वागीर नौदलात सहभागी होईल, असे नौदलाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. दोन वर्षाच्या कालावधीत भारतीय नौदलाला मिळालेली वागीर ही तिसरी पाणबुडी ठरते. वागीरच्या समावेशामुळे नौदलाच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे सांगितले जाते.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि नेव्ही ग्रुप ऑफ फ्रान्सने संयुक्तपणे वागीरची निर्मिती केली आहे. प्रोजेक्ट-७५च्या अंतर्गत भारत सहा स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्यांची निर्मिती करीत आहे. यापैकी एस-२१ आयएनएस कलवरी २०१७ सालच्या डिसेंबर महिन्यात, तर एस-२२ आयएनएस खंदेरी २०१९ सालच्या सप्टेंबर महिन्यात नौदलात सहाभागी करण्यात आली होती. २०२१ सालच्या मार्च महिन्यात आयएनएस करंज, तर २०२१ सालच्या नोव्हेंबर महिन्यात आयएनएस वेला नौदलात सहभागी झाली होती. यानंतर नौदलामध्ये वागीरचा समावेश होणार असून यामुळे नौदलाच्या क्षमतेत अधिकच वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक माधवाल यांनी या वागीरच्या चाचण्या इतर पाणबुड्यांच्या तुलनेत खूपच कमी वेळेत पार पडल्याचे सांगून यामुळे वागीरचा नौदलातील समावेश लवकर होईल, अशी माहिती दिली. प्रोजेक्ट-७५च्या अंतर्गत निर्मिती करण्यात येत असलेल्या या पाणबुड्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेली दमदार पावले ठरतात, असे कमांडर माधवाल पुढे म्हणाले. मुख्य म्हणजे रविवारीच ‘आयएनएस मोरमुगाओ’ ही विनाशिका नौदलात सहभागी झाली होती. यामुळे ठरविक अंतराने नौदलात युद्धनौका, विनाशिका, पाणबुड्यांचा समावेश होत असल्याचे स्वागतार्ह चित्र समोर येत आहे.

भारतीय नौदलातील किलो क्लास पाणबुड्या लवकरच निवृत्त होतील. त्याच्या आधी नौदलात अत्याधुनिक पाणबुड्यांचा समावेश होणे अत्यंत आवश्यक बाब ठरते. यासाठी भारताने नव्या पाणबुड्या तयार करण्यासाठी पावले उचलली होती. विशेषतः हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या नैसर्गिक प्रभावाला आव्हान देण्यासाठी चीनच्या नौदलाने या क्षेत्रातील आपला वावर वाढविण्यास सुरूवात केल्यानंतर, आपल्या नौदलाची क्षमता वाढविणे भारतासाठी अनिवार्य बनले होते. हिंदी महासागर क्षेत्र आपले पसरदार आहे, असे भारताने मानू नये, लवकरच या क्षेत्रात चीन आपला प्रभाव वाढविल, असा इशारा एका चिनी विश्लेषकाने काही काळापूर्वी दिला होता. या इशाऱ्यामुळे चीन हिंदी महासागर क्षेत्रातील आपल्या नौदलाचा वावर अधिक प्रमाणात वाढविणार असल्याचे उघड झाले होते.

चीनची बहुतांश व्यापारी वाहतूक हिंदी महासागर क्षेत्रातूनच केली जाते. यामध्ये इंधनाच्या वाहतुकीचाही समावेश आहे. आपल्या या सागरी वाहतुकीची मलाक्काच्या आखातावर भारतीय नौदल सहजपणे कोंडी करू शकेल, या चिंतेने चीनला ग्रासलेले आहे. म्हणूनच इथले भारतीय नौदलाचे वर्चस्व कमी करण्यासाठी चीनने आपल्या नौदलाच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र प्रयत्न करूनही चीन आपला हा हेतू साध्य करू शकलेला नाही. यामुळेच सीमावाद तसेच इतर कुठल्याही वादात चीन भारताच्या विरोधात टोकाची भूमिका घेऊ शकत नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. म्हणूनच चीन आपल्या नौदलाची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढवित असून नव्या युद्धनौका, विनाशिका व पाणबुड्यांची निर्मिती करीत आहे. हे लक्षात घेऊन भारताला आपल्या नौदलाच्या क्षमतेत सातत्याने वाढ करावीच लागेल. म्हणूनच पुढच्या काळातही भारताने आपल्या नौदलाचे सामर्थ्य अधिक प्रमाणात वाढवावे, असा सल्ला सामरिक विश्लेषक देत आहेत.

leave a reply