अमेरिकेने अफगाणिस्तानात सोडलेल्या शस्त्रांचे चीन-रशिया ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ करतील

- माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आरोप

वॉशिंग्टन/काबुल – अमेरिकेने अफगाणिस्तानमधून घेतलेली माघार ही देशाच्या इतिहासातील अत्यंत लाजिरवाणी घटना असल्याचा ठपका ठेवून चीन व रशियाने अफगाणिस्तानमधील अमेरिकी शस्त्रांचे ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ करतील, असा दावा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अमेरिकेची प्रगत ‘अपाचे हेलिकॉप्टर’ चीन व रशियाच्या हाती पडल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. तसेच अमेरिकेच्या बचाव मोहिमेच्या माध्यमातून अफगाणिस्तानातील दहशतवादी अमेरिकेत घुसल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी घिसाडघाई करीत अमेरिकी लष्कराला अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचे आदेश दिले होते. माघारीची प्रक्रिया पूर्ण करताना अमेरिकी लष्कर अनेक हेलिकॉप्टर्स, विमाने, प्रगत शस्त्रास्त्रे व संरक्षणयंत्रणा तळांवरच सोडून परतले होते. त्याचवेळी तालिबानसमोर माघार घेणार्‍या अफगाणी लष्करानेही त्यांच्याकडील अमेरिकी शस्त्रे व यंत्रणांसह शरणागती पत्करली होती. त्यामुळे अमेरिका अब्जावधी डॉलर्सचे संरक्षणसाहित्य तालिबानसाठी सोडून आल्याची व त्याचा फायदा पाकिस्तान, इराण, चीन व रशिया हे देश उचलतील अशी टीका सुरू झाली होती.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे या टीकेला दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे. आपल्या नेतृत्त्वाखाली जर अमेरिकेच्या लष्कराने माघार घेतली असती तर मी सर्व अमेरिकी शस्त्रे व यंत्रणा माघारी आणण्याचे आदेश दिले असते, असे ट्रम्प म्हणाले. ‘पण आता सर्व तालिबानच्या हाती पडले आहे. चीन व रशियासारख्या देशांनी अमेरिकेची अपाचे हेलिकॉप्टर्स ताब्यात घेतली असतील. त्यांनी या हेलिकॉप्टरचे सर्व भाग सुटे करून त्याचा अभ्यास सुरू केला असेल. रशिया व चीन अशी प्रगत हेलिकॉप्टर बनविण्याचे प्रयत्न सुरू करतील. या कामात ते तज्ज्ञ आहेत’, असा दावा माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला.

‘अमेरिकेने हे सर्व घडू देणे ही देशासाठी अत्यंत बदनामीची गोष्ट आहे. अमेरिकी लष्कराने चाकुच्या सहाय्याने लढाई करणार्‍यांसमोरून पळ काढला. आपल्याकडे एफ-३५ व एफ-१८ होती आणि त्यांच्याकडे फक्त चाकू होते. यामुळे अमेरिकेच्या लष्कराची प्रचंड मानहानी झाली आहे. हे सर्व सर्वोच्च नेतृत्त्वाने व टीव्हीवरून सल्ले देणार्‍या लष्करी अधिकार्‍यांनी घेतलेल्या निर्णयामुळे घडले आहे’, असा घणाघात ट्रम्प यांनी केला. अफगाणिस्तानातून माघार घेण्याचा निर्णय आपल्या कारकिर्दीत झाला असला तरी मी सन्मानाने अमेरिकी लष्कराला माघारी आणले असते, असे ट्रम्प पुढे म्हणाले.

यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकी लष्कराने राबविलेल्या बचावमोहिमेवरही टीकास्त्र सोडले. अफगाणिस्तानातून माघारी आणलेल्यांमध्ये अनेक जण दहशतवादी असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. अफगाणिस्तानातून माघारी आणलेल्यांमध्ये नक्की कोण आहे, याची खात्री पटविण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याकडेही माजी राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले.

leave a reply