उझबेकिस्तानात आश्रय घेतलेले ४५० अफगाणी वैमानिक युएईसाठी रवाना

वॉशिंग्टन – गेल्या महिन्यात तालिबानच्या तावडीतून निसटलेले आणि उझबेकिस्तानात आश्रय घेतलेले अफगाणी हवाईदलाचे ४५० वैमानिक युएईला रवाना होत आहेत. उझबेकिस्तान आणि युएई यांच्यात झालेल्या करारानुसार, ही प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केला जातो. पण अफगाणी हवाईदलाची विमाने आणि हेलिकॉप्टर्सच्या हस्तांतरणाबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. काही आठवड्यांपूर्वी युएईने अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांना देखील आश्रय दिला होता.

महिन्याभरापूर्वी तालिबानने राजधानी काबुलवर ताबा घेतल्यानंतर अफगाणी संरक्षणदलाचे लाखो जवान संशयास्पदरित्या गायब झाले होते. यातील शेकडो जवानांनी सीमा ओलांडून इराण, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये पळ काढल्याच्या बातम्या आल्या होत्या. इराणमध्ये पळालेल्या अफगाणी जवानांनी अमेरिकन बनावटीच्या हम्वी लष्करी वाहनांसह धाव घेतल्याचे व्हिडिओज् समोर आले होते. तरी देखील अमेरिकेत प्रशिक्षण घेतलेले आणि तालिबानवर हवाई हल्ले चढविणारे अफगाणी हवाईदलाचे शेकडो वैमानिक तसेच लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्सबाबतची माहिती समोर आली नव्हती. पण अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ४५० अफगाण वैमानिकांनी ४६ लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्ससह उझबेकिस्तानात आश्रय घेतला होता.

गेले काही दिवस अफगाणी वैमानिक उझबेकिस्तानच्या शरणार्थी शिबिरात राहत होते. या वैमानिकांना तसेच ४६ विमानांना आपल्या हवाली करण्याची मागणी तालिबानने उझबेकिस्तानकडे केली होती. अफगाणी संरक्षणदलाचे वैमानिक व जवानांना आपल्यापासून कुठलाही धोका नसल्याचा दावा तालिबानने केला होता.

महिन्याभरापूर्वी तालिबानवरील भीषण हवाई हल्ल्यांमध्ये अफगाणी वैमानिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या वैमानिकांना तालिबानच्या हवाली केले तर दहशतवादी संघटना या वैमानिकांना जिवंत सोडणार नाही, हे निश्‍चित झाले होते. तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणी वैमानिक व जवानांची क्रूर हत्या घडविल्याची उदाहरणे समोर असल्यामुळे उझबेकिस्तानने तालिबानची ही मागणी धुडकावली.

पण आता उझबेकिस्तानने या साडेचारशे वैमानिक तसेच अधिकार्‍यांना युएईला रवाना करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती अमेरिकी वर्तमानपत्राने दिली. या वैमानिकांचे फोटोग्राफ्सही समोर आले आहेत. पण अफगाणी वैमानिकांनी आपल्यासोबत आणलेली लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्सचे काय होणार? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तरी देखील उझबेकिस्तानने अफगाणी वैमानिकांना युएईच्या हवाली करून तालिबान व तालिबानच्या पाठिराख्यांना स्पष्ट संदेश दिल्याचे बोलले जाते.

leave a reply