चीनकडून अमेरिकी कर्जरोख्यांची मोठ्या प्रमाणात विक्री

- वर्षभरात १७४ अब्ज डॉलर्सची घट

बीजिंग/वॉशिंग्टन- अमेरिकेकडून लादण्यात येणारे निर्बंध व व्याजदरात होणारी वाढ या पार्श्वभूमीवर चीनने अमेरिकी कर्जरोख्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचे समोर येत आहे. २०२२ सालच्या जानेवारी महिन्यात अमेरिकी कर्जरोख्यांचे प्रमाण १.०३ ट्रिलियन डॉलर्स इतके होते. २०२३ साली जानेवारी महिन्याच्या अखेरीस चीनच्या परकीय गंगाजळीतील अमेरिकी कर्जरोख्यांचे मूल्य ८५९ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले आहे. हा गेल्या १३ वर्षातील नीचांक ठरला आहे.

चीनकडून अमेरिकी कर्जरोख्यांची मोठ्या प्रमाणात विक्री - वर्षभरात १७४ अब्ज डॉलर्सची घटगेल्या तीन महिन्यात चीनने १८ अब्ज डॉलर्सहून अधिक कर्जरोख्यांची विक्री केल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर महिन्यात चीनने ७.८ अब्ज डॉलर्सचे कर्जरोखे विकले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात तीन अब्ज डॉलर्स तर जानेवारी महिन्यात ७.५ अब्ज डॉलर्सच्या कर्जरोख्यांची विक्री करण्यात आली. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सात अब्ज डॉलर्सहून अधिक कर्जरोखे विकून चीनने गेल्या वर्षापासून सुरू केलेले विक्रीचे धोरण पुढे कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. २०२२ सालीही चीनने १६५ अब्ज डॉलर्सहून अधिक अमेरिकी रोख्यांची विक्री केली होती. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२३ या १२ महिन्यांच्या कालावधीत चीनच्या परकीय गंगाजळीतून एकूण १७४ अब्ज डॉलर्सचे अमेरिकी कर्जरोख्यांची घट झाली आहे. यापूर्वी २०१० साली चीनमधील अमेरिकी कर्जरोख्यांचे मूल्य ९०० अब्ज डॉलर्सच्या खाली घसरले होते. चीनकडून सातत्याने सुरू असणाऱ्या या विक्रीमागे रशिया-युक्रेन युद्ध, तैवानचा मुद्दा व अमेरिकेकडून चिनी कंपन्यांवर सुरू असलेली कारवाई यासारखे मुद्दे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. चीनकडून अमेरिकी कर्जरोख्यांची मोठ्या प्रमाणात विक्री - वर्षभरात १७४ अब्ज डॉलर्सची घटयात रशियाच्या परकीय गंगाजळीलाही लक्ष्य करण्यात आले होते. रशियाची जवळपास ५० टक्क्यांहून अधिक परकीय गंगाजळी सध्या निर्बंधांमुळे अडकून पडली आहे.

पुढील काळात चीन-तैवान संघर्ष भडकल्यास अमेरिका व पाश्चिमात्य देश आपल्या परकीय गंगाजळीलाही लक्ष्य करु शकतात, अशी भीती चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने अमेरिकी डॉलर्सचे प्रमाण कमी करण्यासाठी चीन पावले उचलत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेकडून गेल्या वर्षभरात चिनी कंपन्यांना सातत्याने ब्लॅकलिस्ट करण्यात येत आहे. त्यामुळे चीनच्या राजवटीत तीव्र नाराजीची भावना असून अमेरिकेला तोडीस तोड प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी चिनी नेते व अधिकारी करीत आहेत.

चीनकडून अमेरिकी कर्जरोख्यांची मोठ्या प्रमाणात विक्री - वर्षभरात १७४ अब्ज डॉलर्सची घटअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात छेडलेल्या व्यापारयुद्धाच्या काळातही अमेरिकी कर्जरोखे व गुंतवणुकीला लक्ष्य करण्याची मागणी चीनमधून झाली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता सध्या चीनकडून सुरू असलेली कर्जरोख्यांची विक्री लक्ष वेधून घेणारी ठरते. चीनकडील परकीय गंगाजळी सध्या तीन ट्रिलियन डॉलर्सहून अधिक असून त्यातील जवळपास ६० टक्के हिस्सा अमेरिकी डॉलर्सचा आहे.

चीनकडून युआन या स्थानिक चलनाचा वापर वाढविण्यासाठी व हे चलन आंतरराष्ट्रीय पातळीवर राखीव चलन म्हणून प्रस्थापित करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी चीन अनेक देशांबरोबरील व्यापारी करार व चलन व्यवहारांमध्ये युआनच्या वापरावर भर देत असून अमेरिकी डॉलरचा वापर घटविण्यासाठी पावले उचलत असल्याचे समोर आले आहे.

हिंदी English

 

leave a reply