बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता

- अमेरिकन वित्तसंस्था गोल्डमन सॅक्सचा इशारा

वॉशिंग्टन – गेल्या सात दिवसात अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या बँका, वित्तसंस्थांमध्ये झालेल्या पडझडीचे थेट परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. या बँकांसाठी कर्ज देण्याचे निकष कडक केल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मंदावू शकते, असा इशारा अमेरिकेतील आघाडीची वित्तसंस्था गोल्डमन सॅक्सने दिला. तर अमेरिकन शेअर बाजारात याचे पडसाद उमटू लागल्याचा दावा अमेरिकेतील विश्लेषक करीत आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमुळे अमेरिकेत वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसाधारण अमेरिकन जनता आपली बिल्स भरू शकत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता - अमेरिकन वित्तसंस्था गोल्डमन सॅक्सचा इशारागेल्या सात दिवसांमध्ये अमेरिकेतील सिल्व्हर गेट, सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक तसेच क्रेडिट स्यू या महत्त्वाच्या बँका, वित्तसंस्था बुडाल्या होत्या. एकट्या अमेरिकेत बँकांना जवळपास ९० अब्ज डॉलर्सचे तर खातेदार तसेच गुंतवणूकदारांचे २०० अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. या बुडालेल्या बँकांपाठोपाठ अमेरिकेतील आणखी किमान ४० बँकांना अर्थसहाय्याची गरज असल्याचे दावे माध्यमे तसेच विश्लेषकांकडून करण्यात येत आहेत. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी देशाचे आर्थिक नुकसान झाले नसल्याचे म्हटले होते.

मात्र अमेरिकेतील आघाडीची वित्तसंस्था गोल्डमन सॅक्सने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसात अमेरिकन बँका, शेअर बाजारात झालेल्या घसरणीचे तीव्र पडसाद अमेरिकन अर्थव्यवस्थेवर झाल्याशिवाय राहणार नाही, असे बजावले आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत छोट्या व मध्यम आकाराच्या बँकाची भूमिका अतिशय असते. सिलिकॉन व्हॅली बँकेवरील संकट व त्याविरोधात लादलेल्या मानकांमुळे अमेरिकेतील छोट्या बँकांच्या व्यवहारांवर व त्याचबरोबर अमेरिकन अर्थव्यवस्थेवर याचा थेट परिणाम होईल, असे गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे.

गेल्या वर्षभरापासून अमेरिकन अर्थव्यवस्थेवर मंदीचे संकट असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत. बायडेन प्रशासन व अमेरिकेतील आघाडीच्या विश्लेषकांनी हे दावे फेटाळले होते. पण बँकिंग क्षेत्रावर कोसळलेल्या संकटानंतर येत्या काळात अमेरिकन बँकांसाठी कर्ज देण्याचे निकष अधिक कडक केली जातील, असा दावा विश्लेषक करीत असल्याचे गोल्डमन सॅक्सने सांगितले. असे झाले तर अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा दावा या वित्तसंस्थेने केला.

दरम्यान, अमेरिकेतील ‘सेन्सस ब्यूरो’ने आयोजित केलेल्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील ३६ टक्के ग्राहकांना गेल्या सात दिवसांमध्ये आपली देयके देणेही अवघड होऊन बसले आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे सेन्सस ब्यूरोने म्हटले आहे.

हिंदी

 

leave a reply