चीनने भारताचा संयम गृहित धरू नये

माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले

नवी दिल्ली – एलएसीवरील आपल्या घुसखोरीच्या कारवायांवर भारत कायम संयमी प्रतिक्रिया देईल, असे चीनने गृहित धरले आहे. पण चीनला आता आपल्या या समजावर फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे, असा इशारा भारताचे माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिला. ‘कार्नेजी इंडिया’ या अभ्यासगटाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘चायना इंडियाज्‌‍ पॉलिसी: लेसन फॉर इंडिया-चायना रिलेशन्स’ या अहवालात माजी परराष्ट्र सचिवांनी हा दावा केला. २०२० साली गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारताच्या चीनविषयक धोरणांमध्ये स्पष्टता आलेली आहे व चीन आपला भागीदार नाही तर वैरी देश असल्याचे भारताचे धोरणकर्ते मानू लागले आहेत, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्याकडे विजय गोखले यांनी लक्ष वेधले.

vijay gokhleभारताचे सामरिक विश्लेषक देखील भारताच्या अतिशय आक्रमक प्रत्युत्तराखेरीज चीन एलएसीवरील आगळीक थांबविणार नाही, असे वारंवार बजावत आहेत. विशेषतः तवांगच्या एलएसीवर ९ डिसेंबर रोजी चीनच्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर, भारताच्या सामरिक विश्लेषक तसेच माजी लष्करी अधिकाऱ्यांनी आपली ही मागणी अधिकच तीव्र केली होती.आधीच्या काळात चीनबरोबर झालेल्या सीमाविषयक करारानुसार एलएसीवर दोन्ही देशांच्या लष्कराला गोळीबार करता येऊ शकत नाही. याचा फायदा घेऊन चीन सातत्याने एलएसीवरील यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. हे रोखायचे असेल तर भारत सरकारने हे करार मोडीत काढून घुसखोरी करणाऱ्या चिनी लष्करावर गोळीबार करण्याची परवानगी भारतीय सैन्याला द्यावी, असे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्लेषक सांगू लागले आहेत.

यासाठी भारत सरकारवर दबाव येत असतानाच, ‘चायना इंडियाज्‌‍ पॉलिसी: लेसन फॉर इंडिया-चायना रिलेशन्स’ हा अहवाल प्रसिद्ध झाला. यात माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी भारताचा संयम चीनने गृहित धरता कामा नये, असे बजावले आहे. आत्तापर्यंत चीन एलएसीवर करीत असलेल्या कारवाया, भारत कायम आपल्या घुसखोरीला संयमी प्रत्युत्तर देईल, या समजुतीवर आधारेल्या होत्या. पण भारत या आघाडीवर सातत्याने संयमच दाखवित राहिल, इथली परिस्थिती चिघळू देणार नाही, या समजुतीवर चीनने फेरविचार करण्याची गरज आहे, ही बाब विजय गोखले यांनी लक्षात आणून दिली.

याबरोबरच आपण अनेक आघाड्यांवर भारतापेक्षा श्रेष्ठ आहोत, हे चीनला वाटत असून ही बाब देखील भारताच्या एलएसीवरील चीनच्या कारवायांना प्रोत्साहन देणारी ठरत असल्याचे गोखले यांनी स्पष्ट केले. म्हणूनच भारताने आपली आर्थिक व राजनैतिक तसेच इतर आघाड्यांवरील क्षमता अधिक प्रमाणात वाढविण्याची आवश्यकता असल्याचा सल्लाही माजी परराष्ट्र सचिवांनी दिला आहे. गलवानच्या संघर्षानंतर चीन हा भारताचा भागीदार देश आहे की शत्रू, याबाबतचा संभ्रम पूर्णपणे दूर झालेला आहे. भारताचे धोरणकर्ते आता चीनकडे स्पर्धक म्हणून नाही, तर शत्रू म्हणून पाहू लागले आहेत. भारताच्या धोरणांमध्ये ही स्पष्टता येत असताना, भारत नेहमीच आपल्या घुसखोरीच्या कारवायांना संयम दाखवून उत्तर देत राहिल, अशी अपेक्षा चीनला ठेवता येणार नाही, हे गोखले यांनी या अहवालात स्पष्ट केले आहे. दरम्यान, चीनने एलएसीवर गोळीबार न करण्याचे तसेच मोठी शस्त्रे न वापरण्याचे करार करून भारताचा प्रतिकार मर्यादित केला व त्यानंतर एलएसीवरील घुसखोरीचे सत्र सुरू केले. एलएसीवरील चीनचे दावे या करारानंतरच्या काळातच अधिक प्रकर्षाने समोर आले होते, याची जाणीव सामरिक विश्लेषकांनी करून दिली आहे.

हिंदी

leave a reply