लादेनला आश्रय देणाऱ्यांना इतरांना उपदेश करण्याचा अधिकार नाही

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची पाकिस्तानला चपराक

संयुक्त राष्ट्रसंघ – ओसामा बिन लादेनला आश्रय देणाऱ्या व शेजारी देशाच्या संसदेवर दहशतवादी हल्ला घडविणाऱ्यांकडे; संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत दुसऱ्या देशाला उपदेश करण्याइतकी विश्वासार्हता असूच शकत नाही, अशा खणखणीत शब्दात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला चपराक लगावली. संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारतावरच दहशतवाद पसरविण्याचे आरोप केले होते. त्याला जयशंकर यांनी पाकिस्तानचा थेट नामोल्लेखही न करता हे सणसणीत प्रत्युत्तर दिले.

no right to preach to othersभारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक मोहीम हाती घेतली आहे. त्याला फार मोठा प्रतिसाद मिळू लागला असून पाकिस्तानची दहशतवादी देश अशी प्रतिमा तयार करण्यात भारताला यश मिळाल्याचे पाकिस्तानचे विश्लेषकच मान्य करू लागले आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तानच्या सरकारने भारतावरच दहशतवादाचे आरोप करण्याचा कांगावाखोर प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हफीज सईद याच्या लाहोरमधील घराजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या दहशतवाद्याच्या घराजवळील बॉम्बस्फोटामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानच्या उपपरराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी नुकताच केला होता. तसेच भारताइतका सफाईदारपणे कुणीही दहशतवाद माजवित नसल्याचे खार यांनी म्हटले होते.

यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत बोलताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी काश्मीरचा मुद्दा उकरून काढला व भारतावर दहशतवादाचे आरोप केले. काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने जनमत चाचणी करावी, अशी मागणी भुत्तो यांनी केली. याला उत्तर देताना भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख देखील केला नाही. मात्र ओसामा बिन लादेनचा पाहुणचार करणारा यजमान देश असलेल्या व शेजारी देशाच्या संसदेवर दहशतवादी हल्ले घडविणाऱ्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून दुसऱ्यांना उपदेश करण्याचा अधिकार नाही. तितकी विश्वासार्हता अशा देशांकडे असू शकत नाही, असा टोला जयशंकर यांनी लगावला.

हिंदी

 

leave a reply