‘पंचेन लामा’ यांचे काय झाले, ते चीनने उघड करावे

- अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची मागणी

वॉशिंग्टन – २५ वर्षांपूर्वी चीनने अपहरण केलेल्या ‘पंचेन लामा’ यांची माहिती निदान आतातरी चीनने उघड करावी, अशी मागणी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे. १७ मे १९९५ रोजी चीनने ‘गेधुन चोरोक्सी नयिमा’ अर्थात ‘पंचेन लामा’ यांचे अपहरण केले होते. त्यावेळी ते सहा वर्षांचे होते. अपहरणाच्या तीन दिवस आधी त्यांची ‘पंचेन लामा’ म्हणून नियुक्ती झाली होती.

तिबेटी बौध्द धर्मियांचे दलाई लामा यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते अशी ‘पंचेन लामा’ यांची ओळख आहे. सहा वर्षांचे असताना ‘गेधुन चोरोक्सी नयिमा’ यांची ‘पंचेन लामा’ म्हणून नियुक्ती झाली होती. तिबेटी बौध्द धर्मियांची स्वतंत्र धार्मिक व सांस्कृतिक ओळख पुसून टाकण्यासाठी दडपशाही करणाऱ्या चीनने ‘पंचेन लामा’ यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांचे काय झाले, याचा थांगपत्ता चीनने जगाला लागू दिलेला नाही. १७ मे १९९५ रोजी चीनने केलेल्या या अपहरणाला २५ वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनचे ‘पंचेन लामा’ यांच्याबाबतची माहिती उघड करावी, अशी मागणी केली आहे.

पंचेन लामा यांना चीनने आपल्या बीजिंग किंवा अन्य शहरात डांबून ठेवले असावे, असे दावे केले जातात. तर चीनच्या निर्दय राजवटीने त्यांचा घात केला असावा, अशीही दाट शक्यता वर्तविली जाते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ‘पंचेन लामा’ यांच्याबाबत केलेली ही मागणी चीनवरील दबाव वाढवित आहे. तिबेटच्या प्रशासनाने देखील ‘पंचेन लामा’ यांची सुटका करावी, अशी मागणी करुन त्यासाठी मोहीम आखली आहे.

हाँगकाँगमध्ये कार्यरत असलेल्या अमेरिकन पत्रकारांना चीनने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर हाँगकाँगच्या ‘स्टेटस’वर फेरविचार करु, अशी धमकी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली होती. यामुळे हाँगकाँगमधील निदर्शकांवर चीन करीत असलेल्या दडपशाहीची बातमी जगासमोर येऊ नये, यासाठी कारवाई करणाऱ्या चीनवरील दडपण वाढले होते. आपल्या सामर्थ्याच्या बळावर तैवानवर अधिकार गाजवू पाहणाऱ्या चीनच्या लष्करी हालचाली खपवून घेणार नाही, असे देखील अमेरिकेने खडसावले होते. आता ‘पंचेन लामा’ यांचे काय झाले? याची माहिती उघड करण्याची मागणी करुन अमेरिकेने आपली स्वतंत्र धार्मिक व सांस्कृतिक ओळख टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या तिबेटी जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. याचे फार मोठे सकारात्मक परिणाम तिबेटमध्ये पहायला मिळू शकतात.

leave a reply