चीनकडून ब्रिटनलाही सदोष किट्सचा पुरवठा

लंडन, दि. 8 (वृत्तसंस्था) – कोरोनाव्हायरसची चाचणी करण्यासाठी चीनने  स्पेन आणि नेदरलँड या देशांना सदोष टेस्टिंग किट्स पुरवण्याचे  उघड झाले होते.  आता ब्रिटनही तशीच तक्रार करीत आहे  चीनने पुरवलेल्या टेस्टिंग स्टेट्स काहीही उपयोग नसून  यासाठी ब्रिटनने मोजलेले पैसे चीनने परत करावे अशी मागणी ब्रिटनने केली आहे  जगावर कोरोनाव्हायरसचे संकट कोसळलेले असताना चीन मात्र आपली सदोष  टेस्टिंग किट्स, वैद्यकीय उपकरणे,  तसेच मास्क यांची विक्री करून आपले उखळ पांढरे करीत असल्याचा आरोप यामुळे अधिकच तीव्र झाला आहे
आतापर्यंत जगभरात ८३ हजारांहून अधिक जण या साथीचे बळी ठरले आहेत, तर लागण झालेल्यांची संख्या १५ लाखांवर पोहोचली आहे. युरोपातील देशांमध्ये या साथीने भयंकर रूप धारण केले आहे. इटली, फ्रान्स, स्पेन, ब्रिटनसह युरोपातील बहुतांश देशांना वैद्यकीय उपकरणे, मास्कची टंचाई भासत आहे. आपल्या देशातून या साथीचे उचाट्टन झाल्याचा दावा करणाऱ्या चीनने या  उपकरणाची मोठया प्रमाणात निर्यात सुरु केली आहे. मात्र यूरोपीय देशांमध्ये चीनकडून निर्यात करण्यात येत असेलेले हे वैद्यकीय साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्प्ष्ट होत आहे. याआधी स्पेनानेही याबद्दल तक्रार केली होती.  चीनने विकलेली एन-९५ मास्कही सदोष आहेत. तसेच टेस्टिंग उपकरणेही  सुमार दर्जाची असून याद्वारे अचूक चाचणी होत नसल्याचा आरोप स्पेनने केला होता. तसेच इटली, नेदरलॅण्ड, जॉर्जियासारख्या देशांनीही असेच आरोप केले होते.
आता ब्रिटनकडूनही असेच आरोप होत आहेत. गेल्या महिन्यात ब्रिटनने चीनकडे  ३५ लाख टेस्टिंग किट्सची मागणी केली होती. मात्र या टेस्टिंग किटची चाचणी घेण्यात आली त्यावेळी मागविण्यात आलेले लाखो टेस्टिंग किट्स  विश्वासहार्य नसल्याचे लक्षात आले. या चिनी किट्सद्वारे कऱण्यात येत असलेल्या चाचणीत निदान चुकीचे होत असल्याचे, ब्रिटनच्या आरोग्य विभागाचे संचालक जॉन न्यूटन यांनी म्हटले आहे. ब्रिटनने  कोरोनाचे टेस्टिंग वाढविण्याची योजना आखली आहे. याची जबाबदारी जॉन न्यूटन यांच्याकडे देण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये सध्या दरदिवशी १० हजार जणांचे टेस्टिंग करण्यात येत आहे. हे टेस्टिंग क्षमता प्रत्येक दिवशी एक लाखापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सदोष चिनी किट्समुळे या मोहिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्रिटन या सदोष किट्सचे सर्व पैसे परत मागणार असल्याची माहिती  न्यूटन यांनी दिली.
चीनमध्ये कोरोनाव्हायरसने धुमाकूळ घातला असताना मानवतेच्या दृष्टीकोनातून  इटलीने चीनला साहाय्य म्हणून सुरक्षा उपकरणे पुरवली होती. मात्र इटली या संकटाच्या विळख्यात सापडल्यावर चीनने इटलीचीच उपकरणे त्यांना विकल्याचा चीड आणणारा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे युरोपियन देशांमध्ये चीनविरोधातील संताप अधिक वाढल्याचे पाहायला मिळते.
संकटाच्या काळात चीन लाभाचा विचार करीत असल्याचा आरोप आता जगभरातून होत आहेत. या विषाणूच्या साथीसाठी  चीनला आधीच जबाबदार धरले जात होते. यासाठी चीनकडून भरपाई वसूल करण्यात यावी अशी मागणी होत आहे. त्यामध्ये चीनकडून पुरवल्या जात असलेल्या सदोष उपकरणे आणि परिस्थितीचा फायदा उचलण्याच्या प्रकारामुळे जगभरातील जनतेमध्ये चीनविरोधातील रोष पुढील काळात अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे चीनची विश्वासहर्ता धोक्यात आली आहे.

leave a reply