जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘जैश’चा कमांडर ठार  

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या  बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षादलाने ‘जैश-ए-मोहम्मद’च्या कमांडरला ठार केले. या चकमकीनंतर सदर भागात शोधमोहीम सुरु आहे.  तीन दिवसांपूर्वीच जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना ठार केले होते. तसेच या चकमकीत भारताचे पाच जवान शहीद झाले होते.         

जम्मू आणि काश्मीरच्या सोपेरमधल्या अरमपुरा भागात दहशतवादी लपून बसल्याची खबर सुरक्षा दलांना मिळाली होती. मंगळवारी रात्रीच सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर बुधवारी सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात ‘जैश’चा प्रमुख कमांडर ‘साजाद नवाब पार’ याला संपविण्यात आले. त्याच्या कडून एक ‘ एके रायफल’, तीन एके मँगि्झन’ इत्यादी शस्त्रसाठा जप्त केला. ‘२२ राष्ट्रीय रायफल्स’,  ‘केंद्रीय राखीव पोलीस दल’ आणि सोपेर पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.                        

दरम्यान, बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी सेक्टरमधल्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या लष्कराकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान नियंत्रणरेषेवर गोळीबार करुन दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र भारतीय लष्कराने त्यांचे हे कारस्थान उधळून लावले आहेत.  

leave a reply