एलएसीवर ब्रह्मोसच्या तैनातीवरुन चीनची भारताला नवी धमकी

बीजिंग – चीनबरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात करण्याची घोषणा केल्याने, चीनचे धाबे दणाणले आहेत. चीनचे विश्‍लेषक यावर चिंता व्यक्त करीत असून भारताच्या या निर्णयामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव अधिकच वाढेल, असा इशारा देत आहेत. हा तणाव वाढून त्याचे संघर्षात रुपांतर होईल, अशी धमकी चिनी लष्कराचे तज्ज्ञ सॉंग झोंगपिंग यांनी दिली आहे. तसेच ब्रह्मोसला उत्तर देणारी यंत्रणा चीनने तयार ठेवली आहे, असा दावाही झोंगपिंग यांनी केला.

एलएसीवर ब्रह्मोसच्या तैनातीवरुन चीनची भारताला नवी धमकीएका याचिकेच्या सुनावणीत आपली भूमिका मांडताना भारत सरकारने एलएसीवरील लष्करी पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या निर्णयांचे समर्थन केले होते. राष्ट्रीय सुरक्षेसाठी या क्षेत्रात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात केली जातील व त्यासाठी इथे पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविणे आवश्यक असल्याचे भारत सरकारने म्हटले होते. याची गंभीर दखल चीनने घेतली आहे. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या भारतीय माध्यमांमधील बातम्यांचा दाखला देऊन चीन भारताला ब्रह्मोसच्या तैनातीविरोधात इशारा देत आहे.

भारत व रशियाने मिळून ब्रह्मोस क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्रांमध्ये ब्रह्मोसचा समावेश केला जातो. अतिप्रगत रडार यंत्रणा देखील ब्रह्मोसचा वेध घेऊ शकत नाही, असे दावे केले जातात. या क्षेपणास्त्राची निर्मिती भारतातच होत असून इतर काही देश भारताकडे या क्षेपणास्त्राची मागणी करीत आहेत. ब्रह्मोसबाबत आलेल्या या बातमीमुळे चीन असुरक्षित बनल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

ब्रह्मोसच्या एलएसीवरील तैनातीपासून चीनला धोका नाही, पण यामुळे एलएसीवरील तणाव प्रचंड प्रमाणात वाढेल, असे इशारे चीनकडून दिले जात आहेत. चीनकडे ब्रह्मोस नष्ट करण्याची क्षमता आहे, असे सांगून सीमेवरील भारताच्या पायाभूत सुविधा चीनच्या तुलनेत अतिशय सुमार दर्जाच्या असल्याचा शेरा झोंगपिंग यांनी मारला आहे. हे खरे असेल तर मग ब्रह्मोसच्या तैनातीची चीनला चिंता करण्याचे कारणच उरत नाही. तरीही चीन ब्रह्मोसच्या तैनातीवर चिंता करीत आहे, ही बाबच झोंगपिंग यांच्या दाव्यातील विसंगती दाखवून देणारी ठरते.

गेल्या काही दिवसांपासून चीन आपले लष्करी सामर्थ्य, एलएसीवरील अद्ययावत पायाभूत सुविधा, भारताच्या तुलनेत खूपच पुढारलेल्या असल्याचे दावे सातत्याने करीत आहे. आपल्या सरकारी माध्यमांमध्ये या संदर्भातील बातम्या सोडून चीन मानसिक दबावतंत्राचे प्रयोग करीत आहे. त्याचवेळी भारताच्या हद्दीत घुसून चिनी लष्कराने गाव वसविल्याची अवास्तव माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये येत राहील, याचीही तजवीज चीनने केलेली आहे. मात्र प्रत्यक्षात लडाखपासून अरुणाचलप्रदेश पर्यंतच्या एलएसीवर भारतीय लष्कर वर्चस्व गाजवित असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. इतकेच नाही तर चीन यामुळे धास्तावल्याचेही संकेत मिळत आहेत. ब्रह्मोसबाबत आलेल्या बातमीवर चीनकडून आलेली ही प्रतिक्रिया याची साक्ष देत आहे.

leave a reply