भारताचे लष्करप्रमुख इस्रायलच्या दौर्‍यावर

तेल अविव – भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे इस्रायलच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी इस्रायलचे लष्करप्रमुख मेजर जनरल तामिर यादेई यांच्याशी चर्चा केली. उभय देशांमधील लष्करी सहकार्य व्यापक करण्याचा व दहशतवाद्यांवरील कारवाईबाबतचे सहकार्य वाढविण्याचे मुद्दे या चर्चेत अग्रस्थानी होते. लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचा हा पाच दिवसांचा इस्रायल दौरा म्हणजे सर्वसामान्य बाब नसून भारत व इस्रायलचे लष्करी सहकार्य वेगळ्याच उंचीवर पोहोचल्याचे संकेत यातून मिळत असल्याचा दावा पाकिस्तानचे विश्‍लेषक करीत आहेत.

भारताचे लष्करप्रमुख इस्रायलच्या दौर्‍यावरकाही दिवसांपूर्वीच भारत व इस्रायलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील संशोधनाबाबत सहकार्य करार संपन्न झाला होता. यामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नोलॉजी, ड्रोन्स, रोबोटिक्स, बायो सेन्सिग आणि ब्रेनमशिन इंटरफेस अतिप्रगत तंत्रज्ञानावरील संयुक्त संशोधन व निर्मितीबाबतच्या सहकार्याचा समावेश आहे. भारताची डीआरडीओ व इस्रायलची ‘डायरेक्टोरेट ऑफ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ या संस्थांमध्ये हा करार झाला आहे. लष्करी तंत्रज्ञानात इस्रायल हा जगात सर्वाधिक आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक मानला जातो. या क्षमतेमुळे इस्रायल आखातासह जगातील फार मोठे लष्करी सामर्थ्य असलेला देश असल्याचे बोलले जाते. आपली ही क्षमता सतत वाढवित नेण्याचे आक्रमक धोरण इस्रायलने स्वीकारलेले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगती, त्यावरील संशोधन यासाठी इस्रायल भारताशी करीत असलेले सहकार्य दुर्लक्षित करता येणार नाही. कारण याचा फार मोठा लाभ भारताला मिळेल, असा इशारा पाकिस्तानच्या एका विश्‍लेषकाने दिला आहे.

इस्रायलबरोबरील या सहकार्यामुळे भारताला प्रगत लष्करी तंत्रज्ञान उपलब्ध होईल, हे लक्षात आणून देऊन यामुळे पाकिस्तान व चीनसमोर नवी आव्हाने उभी राहतील, असे या पाकिस्तानी विश्‍लेषकाचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर, जनरल नरवणे यांच्या इस्रायल दौर्‍याचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. या दौर्‍याचे सारे तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. मात्र भारत इस्रायलकडून अतिप्रगत ड्रोन्स तसेच इतर शस्त्रास्त्रे व संरक्षण साहित्याच्या खरेदीसाठी उत्सुक असल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे लष्करप्रमुखांच्या या दौर्‍यात भारत व इस्रायलमध्ये नव्या संरक्षण कराराची शक्यता समोर येत आहे. पाकिस्तानसह चीन देखील भारत व इस्रायलमधील या सहकार्यावर नजर ठेवून आहे. चीनबरोबरील तणाव वाढलेला असताना, भारतीय लष्कराने एलएसीवर इस्रायली बनावटीचे ड्रोन्स वापरले होते. यामुळे चिनी लष्कराच्या हालचाली वेळीच टिपणे भारतीय लष्कराला शक्य झाले. चिनी लष्कराच्या घुसखोरीविरोधात वेळीच कारवाई करून त्याला भारतीय सैन्याकडून सणसणीत प्रत्युत्तर दिले जात आहे.

leave a reply