तैवानजवळून युद्धनौका रवाना करणार्‍या अमेरिका व कॅनडाला चीनची धमकी

अमेरिका व कॅनडाबीजिंग – अमेरिका व कॅनडाच्या युद्धनौकांनी तैवानच्या सागरी क्षेत्रातून केलेल्या प्रवासावर चीनने संताप व्यक्त केला आहे. अमेरिका व कॅनेडियन युद्धनौकांची गस्त या क्षेत्रातील शांती व स्थैर्याची हानी करणारी असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. तर मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिका व कॅनडा आपल्या मित्रदेशांच्या पाठिशी आहे, हा संदेश देण्यासाठी ही गस्त होती, असे अमेरिकेने म्हटले आहे.

चीन आणि तैवानला विभागणारा १८० किलोमीटर रुंदीचे सागरी क्षेत्र हा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जगातील सर्वाधिक संवेदनशील पट्टा मानला जातो. या सागरी क्षेत्रात चीन आणि तैवानच्या गस्तीनौका मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये तणाव वाढल्याने चीन व तैवानने या सागरी क्षेत्रातील गस्त अधिकच वाढविली आहे. अशा परिस्थितीत, १५ ऑक्टोबर रोजी, अमेरिकेची ‘युएसएस डेवे’ ही बुर्के श्रेणीतील युद्धनौका तर कॅनडाची ‘एचएमसीएस विनीपेग’ या विनाशिकेने तैवानच्या सागरी क्षेत्रातून प्रवास केला.

अमेरिका व कॅनडाअमेरिकेच्या लष्कराने निवेदन प्रसिद्ध करून युद्धनौकांच्या गस्तीचे समर्थन केले. पण अमेरिका व कॅनडाच्या युद्धनौकांनी तैवानच्या सागरी क्षेत्रातून प्रवास केल्यामुळे चीनची बेचैनी वाढली आहे. चीनच्या लष्कराने अमेरिका व कॅनडाच्या युद्धनौकांची ही गस्त क्षेत्रात तणाव वाढवून शांती व स्थैर्यासाठी धोकादायक ठरत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर तैवान हा चीनचा भूभाग असल्याचा दावा करून देशाच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍यांविरोधात चीनचे लष्कर नेहमीच सज्ज असते, अशी धमकी चीनच्या लष्कराने दिली.

चीनकडून गेल्या काही दिवसांमध्ये तैवानला धमक्या दिल्या जात आहेत. गेल्याच आठवड्यात चीनच्या दीडशेहून अधिक लढाऊ विमानांनी अवघ्या तीन दिवसात घुसखोरी केली होती. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी अमेरिका व कॅनडाजिनपिंग यांनी जाहीररित्या तैवानच्या विलिनीकरणाची भाषा करून हे विलिनीकरण सामोपचाराने झाले तर ते श्रेयस्कर असेल, असे बजावले होते. तर तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी चीनच्या लष्करी सामर्थ्याविरोधात उभे राहण्याची घोषणा केल्यानंतर चिनी माध्यमांनी तैवानला ‘डूम्स डे’ अर्थात संपूर्ण विनाशाची धमकी दिली होती. तसेच तैवानविरोधातील मोहिमेसाठी चीनचे लष्कर हायअलर्टवर असल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, चीन व तैवानमधील तणाव टोकाला पोहोचला असून येत्या काळात चीन तैवानवर हल्ला करू शकतो, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. तर तैवानवरुन अमेरिका व चीनमध्येही संघर्ष भडकू शकते, असे इशारे विश्‍लेषक देत आहेत. यामुळे चीनकडून अमेरिका व कॅनडाला दिल्या जाणार्‍या इशार्‍यांचे गांभीर्य वाढले आहे.

leave a reply