चीन ‘एआय’च्या सहाय्याने विनाशिकांची निर्मिती करणार

चीनच्या संशोधकांचा दावा

बीजिंग – प्रशिक्षित इंजिनिअर्स आणि प्रगत कॉम्प्युटर्सच्या सहाय्याने विनाशिकेचे डिझाईन तयार करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागतो. पण ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अवघ्या काही तासात विनाशिकेचे ४०० हून अधिक डिझाईन तयार करण्यात यश मिळाले आहे. यामुळे येत्या काळात चीन अतिशय वेगाने विनाशिकांची निर्मिती करू शकतो, असा दावा चीनमधील संशोधकांनी केला आहे. अमेरिकेच्या तुलनेत चीनचे नौदल आपली संख्या वाढवित असल्याचा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वीच दिला होता. त्या पार्श्वभूमीवर चीनच्या संशोधकांनी केलेल्या दाव्याचे महत्त्व वाढल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे सांगत आहेत.

jinping army navyगेल्या महिन्यात चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीशी संबंधीत जर्नलमध्ये ‘कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्यूफॅक्चरिंग सिस्टिम्स’मध्ये लेख प्रसिद्ध झाला होता. चीनमधील संशोधकांच्या एका गटाने एआयच्या सहाय्याने विनाशिकेमधील इलेक्ट्रिकल यंत्रणेचे एका दिवसात डिझाईन तयार केले होते. नौदलाचे इंजिनिअर्स आणि जगातील प्रगत कॉम्प्युटर्स देखील यासाठी किमान वर्षभराचा अवधी घेतात, असे या लेखात म्हटले होते. त्याचबरोबर एआयने १०० टक्के अचूकतेने विनाशिकेच्या निर्मितीशी प्रत्येक डिझाईन तयार केले होते

. यामध्ये विनाशिकेतील जटील डिझाईन्सचा देखील समावेश होता, असा दावा या लेखात करण्यात आला होता.

‘चायना’ज्‌‍ शिप डिझाईन अँड रिचर्स सेंटर’ने देखील एआयच्या सहाय्याने विनाशिकेचे ४०० हून अधिक डिझाईन्स तयार केल्याचे जाहीर केले. चीनच्या लष्कराशी संबंधित वरिष्ठ इंजिनिअर लुओ वेई यांनी देखील एआयवर आधारीत हा प्रोग्राम वापरासाठी तयार असल्याचे जाहीर केले. चीनच्या विनाशिका निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या वापरासाठी तयार असल्याचा दावा वेई यांनी केला. या एआयवर आधारीत प्रोग्राममुळे चीनमधील विनाशिकांच्या निर्मितीचा वेग वाढील, असेही वेई म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकन नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, चीनच्या संशोधकांचा हा दावा पाश्चिमात्य माध्यमांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठे आरमार असल्याचा दावा केला जातो. पण लवकरच चीन या आघाडीवर अमेरिकेला मागे टाकेल, असा इशारा अमेरिकन नौदलाच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी केला होता. अमेरिकेमध्ये युद्धनौका, विनाशिकांच्या निर्मितीचे कार्य फारच दिरंगाईने सुरू आहे. या तुलनेत चीनमधील विनाशिकांच्या निर्मितीचे काम अतिशय वेगाने सुरू असल्याचा दाखला या अमेरिकन नौदलाच्या प्रमुखांनी दिला होता. त्यामुळे कागदोपत्री सामर्थ्यशाली वाटणारे अमेरिकेचे नौदल चीनच्या नौदलासमोर काहीही नसल्याचा दावा अमेरिकन नौदल प्रमुखांनी केला होता. अशा परिस्थितीत, चीनच्या संशोधकांनी एआयच्या सहाय्याने विनाशिकांच्या निर्मितीचा वेग वाढेल, याबाबत केलेली घोषणा लक्षवेधी ठरते.

दरम्यान, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकन नौदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी चीन वेगाने विमानवाहू युद्धनौकांची निर्मिती करीत सुटला आहे. लवकरच चीनचे नौदल या क्षेत्रातील अमेरिकन नौदलासाठी आव्हान ठरेल, असे इशारे अमेरिकन माध्यमे देत आहेत. पण या विमानवाहू युद्धनौकांवरील विमानांसाठी चीनकडे प्रशिक्षित, तरबेज वैमानिक नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. चीनने वैमानिकांच्या शोधासाठी नवी भरती सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे चीन आपल्या लष्करी सामर्थ्याचा आभास निर्माण करीत असल्याचे दिसत आहे.

leave a reply