काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तान अपयशी तर भारत यशस्वी ठरला

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची कबुली

संयुक्त राष्ट्रसंघ – अन्नधान्याची टंचाई, प्रचंड महागाई, बेरोजगारी या समस्यांसह कर्ज मिळवण्यासाठी जवळपास प्रत्येक देशाकडे हात पसरणाऱ्या पाकिस्तानला अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरील या दारूण अपयशाची चिंता वाटत नाही. तर काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या अजेंड्यावर आणण्यात मिळालेल्या अपयशाचे फार मोठे दुःख पाकिस्तानला वाटत असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी याची कबुली दिली. काश्मीरच्या प्रश्नावर भारत संयुक्त राष्ट्रसंघात कठोरपणे व बुलंद आवाजात आपली भूमिका मांडत असल्याने पाकिस्तानचे काकाश्मीरहीच चालत नाही, हे बिलावल भुत्तो यांनी मान्य केले.

Kashmir issueसंयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगासमोर यावर्षीही पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चा प्रश्न उपस्थित करून भारतावर चिखलफेक केली. त्यांचे आरोप उत्तर देण्याच्या लायकीचे देखील नाहीत, असे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या राजदूत रूचिरा कंबोज यांनी फटकारले होते. तर शुक्रवारी राष्ट्रसंघाच्या महिला आयोगासमोर बोलताना देखील पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून भारतावर दोषारोप केले. काश्मीरच्या समस्येशी संयुक्त राष्ट्रसंघाचे काहीही देणेघेणे नाही, असे पटवून देण्यात भारताला यश मिळत असल्याचा दावा भुत्तो यांनी केला.

ज्यावेळी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतो, त्यावेळी भारताकडून त्यावर अत्यंत कठोर आणि बुलंद आवाजात प्रतिक्रिया दिली जाते. यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अजेंड्यावर काश्मीरचा प्रश्न आणणे पाकिस्तानसाठी अवघड बनत चालले आहे कारण भारत या आघाडीवर यशस्वी ठरला आहे, असे भुत्तो यांनी स्पष्ट केले. हे दावे करीत असताना भुत्तो यांनी भारताचा उल्लेख आमचा मित्रदेश असा केला. पण पुढच्या वाक्यातच त्यांनी आपण हे सद्भावनेने केले नसून ती चूक होती, हे दाखवून दिले. पुढच्या वाक्यात त्यांनी भारताचा उल्लेख शेजारी देश असा केला.

दरम्यान, भारताला परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर मिळत असलेल्या यशाकडे पाकिस्तानचे विश्लेषक व पत्रकार डोळे विस्फारून पाहत आहे. भारताने सात दशकात इतकी मोठी प्रगती केली आहे की एकाच वेळी भारत अमेरिका व रशियाबरोबरही उत्तम संबंध राखून आहे, यावर पाकिस्तानची माध्यमे आश्चर्य व्यक्त करीत आहेत. जी२० परिषदेचे आयोजन करणारा भारत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला एकाकी पाडण्यात पूर्णपणे यशस्वी ठरला. बड्या देशांचा एकही नेता पाकिस्तानाचा दौरा करायला तयार नाही. पण भारताला प्रमुख देशांचे नेते सातत्याने भेट देत आहेत. हे भारताचे फार मोठे यश तर पाकिस्तानचे अपयश ठरते, असा दावा पाकिस्तानी पत्रकार करीत आहेत. असे असले तरी या अपयशाची बिलावल भुत्तो यांनी त्याची परराष्ट्रमंत्री या नात्याने दिलेली कबुली लक्षवेधी बाब ठरते आहे.

leave a reply