डिजिटल युआनचा वापर वाढविण्यासाठी चीनने जलदगतीने कारवाया सुरू केल्या

बीजिंग – चीनच्या चेंगडू शहरातील प्रशासनाने काही दिवसांपूर्वी आपल्या दोन लाख नागरिकांना चार कोटी युआनची भेट दिली. ही चीनमधील प्रशासनाने आपल्या नागरिकांना दिलेली सर्वात मोठी भेट ठरली आहे. याचे कारण ही भेट ‘डिजिटल करन्सी’च्या रुपात असून इतक्या मोठ्या प्रमाणात डिजिटल करन्सीच्या वापराची चाचणी घेणारा चीन हा पहिलाच देश ठरला आहे. आपल्या नागरिकांना कोट्यवधी ‘डिजिटल युआन करन्सी’ देत असतानाच चीनच्या मध्यवर्ती बँकेने ‘संयुक्त अरब अमिराती’ (युएई) व थायलंड या दोन देशांबरोबर डिजिटल करन्सी प्रोजेक्टवरही काम सुरू केल्याचे समोर आले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सांभाळणार्‍या ‘बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स’ने (बीआयएस) डिजिटल करन्सीच्या मुद्यावर नुकताच एक अहवालही प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, जगातील प्रमुख ६५ मध्यवर्ती बँकांपैकी ५५ बँका ‘डिजिटल करन्सी’च्या योजनेवर काम करीत आहेत. त्यातील ६० टक्के बँकांनी येत्या सहा वर्षात रिटेल क्षेत्रासाठी ‘डिजिटल करन्सी’चा वापर सुरू झालेला असेल, असे संकेत दिले आहेत. यावरून चीनकडून ‘डिजिटल युआन’च्या वापरासाठी वेगाने हालचाली करीत असल्याचे दिसून येते.

चीनने आतापर्यंत आपल्या चार विविध शहरांमध्ये स्थानिक नागरिकांना ‘डिजिटल युआन’ची भेट देऊन त्याचा वापर टप्प्याटप्प्याने वाढविण्याचे संकेत दिले आहेत. जागतिक पातळीवर इतर देशांशी डिजिटल करन्सीचे व्यवहार सुरू करण्यासाठीच्या योजनेतील सहभाग हा त्याचा पुढचा टप्पा मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांबरोबर ‘डिजिटल करन्सी’चा वापर सुरू झाल्यास आपल्या आर्थिक व तांत्रिक सामर्थ्याच्या बळावर चीन त्यात आघाडी मिळवू शकतो, असा विश्‍लेषकांचा दावा आहे.

चीनकडून ‘डिजिटल करन्सी’साठी सुरू असलेल्या हालचाली हा युआन चलनाला जागतिक स्तरावर प्रमुख चलन म्हणून आणण्याच्या व्यापक योजनेचा भाग मानला जातो. चीनने गेल्या दोन दशकात आपले चलन ‘युआन’ आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वमान्य व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात पावले उचलली आहेत. त्यासाठी जगातील अनेक प्रमुख देशांशी चलन व्यवहारांसाठी करार केले असून व्यापारातही युआनचा वापर वाढविला आहे. आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत होणार्‍या व्यवहारांमध्ये युआनचा वाटा सुमारे चार टक्के इतका आहे. तर जगातील विविध देशांकडे असलेल्या परकीय गंगाजळीतील युआनचा हिस्सा २.१३ टक्क्यांपर्यंत गेल्याचे सांगण्यात येते.

युआनला आंतरराष्ट्रीय चलन बनविणे हा चीनच्या कम्युस्टि राजवटीकडून अमेरिकेकडून महासत्तापद खेचून घेण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यासाठी चीनने रशियासह आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील उगवत्या अर्थव्यवस्था म्हणून ओळखण्यात येणार्‍या देशांना हाताशी धरल्याचे दिसून आले आहे.

या देशांमध्ये व त्यांच्याबरोबरील व्यवहारांमध्ये युआनचा हिस्सा वाढवित जाण्याचे धोरण चीनच्या राजवटीने स्वीकारले आहे. मात्र कोरोनाच्या साथीमुळे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदनामीचा फटका बसल्याने चीनच्या या योजनेला काही प्रमाणात खीळ बसली होती. म्हणूनच चीन ‘डिजिटल युआन’ला वेग देऊन आपली महत्त्वाकांक्षा पुढे दामटण्याचा प्रयत्न करीत आहे.

चीनचे सध्याचे जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थान आणि सत्ताधारी राजवटीची महत्त्वाकांक्षा याचा विचार करता चीनकडून डिजिटल युआनसाठी चाललेल्या हालचाली जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम घडविणार्‍या ठरु शकतात, असा दावा जपानमधील आघाडीच्या वर्तमानपत्राने केला आहे.

leave a reply