जर्मनीत ‘आयएस’समर्थक कट्टरपंथी गटांवर मोठी कारवाई

बर्लिन – जर्मनीच्या सुरक्षायंत्रणांनी ‘आयएस’ समर्थक कट्टरपंथी गटांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान, राजधानी बर्लिन व ब्रँडनबर्ग प्रांतात अनेक जागांवर धाडी टाकण्यात आल्या असून अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. कारवाई करण्यात आलेल्या गटाचा संबंध २०१६ साली जर्मनीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी असल्याचे सांगण्यात येते. या महिन्यात जर्मनीने दहशतवाद्यांविरोधात केलेली ही दुसरी मोठी कारवाई ठरते.

जर्मन सरकारने नुकतीच ‘तौहिद बर्लिन’ या कट्टरपंथी गटावर बंदी टाकल्याचे जाहिर केले होते. ‘तौहिद बर्लिन हा दहशतवादी हल्ल्यांचे समर्थन करणारा गट आहे. या गटाने जर्मन राज्यघटना मानण्यास नकार देऊन आयएस या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीचा प्रसार करण्यास सुरुवात केली आहे. जर्मनीला दहशतवादाचा धोका अजूनही मोठ्या प्रमाणात असून तौहिद बर्लिनवर टाकलेली बंदी कट्टरपंथियांविरोधातील मोहिमेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरतो’, अशी माहिती जर्मनीचे संसद सदस्य अँड्रिआस गिसेल यांनी दिली.

तौहिद बर्लिनवर टाकलेल्या बंदीनंतर जर्मन सुरक्षायंत्रणांच्या ‘स्पेशल वेपन्स अ‍ॅण्ड टॅक्टिक्स’ पथकांसह विशेष दलांनी राजधानी बर्लिन व नजिकच्या भागात मोठी कारवाई केली. या कारवाईत जर्मन सुरक्षा यंत्रणांच्या जवळपास ८५० अधिकारी व जवानांनी भाग घेतल्याचे सांगण्यात येते. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्रे व इतर गोष्टी जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र मोहिमेसंदर्भातील इतर माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

जर्मन यंत्रणांनी या महिन्यात दहशतवाद्यांविरोधात केलेली ही दुसरी मोठी कारवाई ठरते. दोन आठवड्यांपूर्वी जर्मन यंत्रणांनी डेन्मार्कच्या सहाय्याने ‘आयएस’विरोधात मोहीम राबविली होती. या संयुक्त कारवाईत शॉटगन्स, रायफल, बॉम्ब बनविण्याची साधने, केमिकल्स तसेच ‘आयएस’चा झेंडा जप्त करण्यात आला होता. डेन्मार्क व जर्मनीसह युरोपिय देशांमध्ये दहशतवादी हल्ले घडविण्याचा मोठा कट उधळल्याचा दावा डेन्मार्कच्या यंत्रणांनी केला होता.

जर्मनीत गेल्या काही वर्षात कट्टरपंथियांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर आले आहे. जर्मनीच्या अंतर्गत गुप्तचर यंत्रणेने गेल्या वर्षी दिलेल्या अहवालात देशातील कट्टरपंथियांची संख्या १२ हजारांवर गेल्याचा इशारा दिला होता. गेल्या नऊ वर्षात कट्टरपंथियांच्या संख्येत तब्बल तिपटीहून अधिक वाढ झाली असल्याचेही गुप्तचर यंत्रणेने म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर जर्मन यंत्रणांनी केलेली नवी कारवाई महत्त्वाची ठरते.

दोन वर्षांपूर्वी जर्मन यंत्रणांनी राजधानी बर्लिनसह देशाच्या इतर भागातील अरब गुन्हेगारी टोळ्यांविरोधात व्यापक कारवाई केली होती. त्या कारवाईत जर्मनीतील जवळपास सहा शहरांमध्ये अरब गुन्हेगारी टोळ्यांचे अड्डे व त्यांच्याकडून वापरण्यात येणार्‍या विविध व्यावसायिक उपक्रमांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्या कारवाईत जर्मन सुरक्षायंत्रणांच्या सुमारे १३०० जवानांनी भाग घेतला होता. गुरुवारी राबविलेली मोहीम त्यानंतरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply