अमेरिकी सिनेटर्सच्या तैवान दौर्‍यावर चीनची तक्रार

बीजिंग/वॉशिंग्टन/तैपेई – अमेरिकेच्या तीन वरिष्ठ सिनेटर्सनी केलेला तैवान दौरा चीनला चांगलाच अस्वस्थ करणारा ठरला आहे. चीनने या दौर्‍यावर तीव्र नाराजी व्यक्त करतानाच अमेरिकेकडे याची उघड तक्रारही नोंदविली आहे. चीनची प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, ‘रेड लाईन’ ओलांडल्यावरही चीनची राजवट काही करणार नसेल तर इतर देश तैवानला चीनचा भाग कसा मानतील, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

अमेरिकी सिनेटर्सच्या तैवान दौर्‍यावर चीनची तक्राररविवारी अमेरिकेचे तीन सिनेटर्स हवाईदलाच्या ‘सी-17 ग्लोबमास्टर 3’ या विमानाने तैवानमध्ये दाखल झाले. या सिनेटर्समध्ये डेमोक्रॅट पक्षाच्या टॅमी डकवर्थ, ख्रिस्तोफर कून्स व रिपब्लिकन पक्षाचे डॅन सुलिवन यांचा समावेश होता. तिन्ही सिनेटर्सनी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यावेळी अमेरिकेकडून तैवानला साडेसात लाख कोरोना लसी देण्याची घोषणाही करण्यात आली. कोरोनाची साथ व त्यापलिकडेही तैवानच्या जनतेला जे सहकार्य हवे आहे, त्यासाठी अमेरिका नेहमी तुमच्या बाजूने उभी राहिल, अशी ग्वाही यावेळी अमेरिकी सिनेटर्सकडून देण्यात आली.

अमेरिकी सिनेटर्सचा हा दौरा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानबाबत स्वीकारलेले धोरण पुढे चालविण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो. ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या तीन वरिष्ठ अधिकार्‍यांनी तैवानला उघडपणे भेट दिली होती. माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी तैवानसंदर्भातील धोरण जाहीर करताना अमेरिकी अधिकार्‍यांच्या तैवान भेटीवर असलेले निर्बंध उठविण्यात आल्याची माहिती दिली होती. ही बाब अमेरिका व तैवान सहकार्य वाढविण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांमधील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.अमेरिकी सिनेटर्सच्या तैवान दौर्‍यावर चीनची तक्रार

सध्या अमेरिका व चीनमध्ये जबरदस्त तणाव असून तैवान हा त्यातील प्रमुख मुद्दा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2019 साली एका कार्यक्रमात उघडपणे तैवान ताब्यात घेण्यासाठी सर्व पर्याय वापरले जातील, असा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेने आपले धोरण अधिक आक्रमक करून तैवानच्या सागरी क्षेत्रातील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्या होत्या. त्याला राजनैतिक दौरे व इतर निर्णयांची जोड देऊन अमेरिकेने तैवान मुद्यावर चीनला शह देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

अमेरिकी सिनेटर्सच्या तैवान दौर्‍यावर चीनची तक्रारअमेरिकेच्या या प्रयत्नांवर चीनकडून वारंवार नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रविवारच्या दौर्‍यानंतरही चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी अमेरिकेच्या दौर्‍यावर नाराजी व्यक्त केली. अमेरिकेने तैवानबरोबरील संबंध तोडून टाकावेत, असा इशाराही वेन्बिन यांनी दिला. त्याचवेळी अमेरिकेकडे राजनैतिक पातळीवर अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याचेही चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्यांनी सांगितले. चीनची अधिकृत प्रतिक्रिया फारशी आक्रमक नसली तरी प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर अमेरिकी दौर्‍याचे तीव्र पडसाद उमटले.

यापूर्वी चीनने तैवान ही ‘रेड लाईन’ असेल असे वारंवार सांगितले असतानाही अमेरिका त्याचे उल्लंघन कसे करते, असा संतप्त सवाल सोशल मीडियात विचारण्यात आला आहे. सिनेटर्सच्या दौर्‍यासाठी हवाईदलाचे लष्करी विमान पाठविणे हे चीनला उघड आव्हान असल्याचा आक्रमक सूरही चिनी नेटिझन्सनी व्यक्त केला. काही नेटिझन्सनी अमेरिका थेट संघर्षात न उतरता ‘सलामी स्लायसिंग’चे धोरण अवलंबित असल्याचा आरोपही केला.

leave a reply