चीन नेपाळचाही तिबेटप्रमाणेच घात करील – तिबेटींच्या निर्वासित सरकारच्या प्रमुखांचा नेपाळला इशारा

नवी दिल्ली/ धरमशाला – ”चीनने तिबेटपर्यंत पहिल्यांदा रस्ता बनवला, त्यानंतर त्याच रस्त्याने सैनिक, रणगाडे, तोफा आणून चीनने तिबेटचा ताबा घेतला. नेपाळ सरकार वेळीच सावध झाले नाही, तर चीन नेपाळाचाही तिबेटप्रमाणेच घात करील”, अशा शब्दात भारतातील निर्वासित तिबेटियन सरकारचे प्रमुख डॉ. लॉबसांग सांगेय यांनी नेपाळला सावध केले आहे. ”तिबेट हा पंजा असून त्याची बोटे म्हणजे लडाख, नेपाळ, भूतान, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश हे भूभाग आहेत, असे चीनचे संस्थापक माओ त्से तुंग यांनी म्हटले होते, याची आठवणही डॉ. लॉबसांग सांगेय यांनी नेपाळला करून दिली.

लडाखमध्ये गेल्या दीड महिन्यापासून भारत आणि चीनमध्ये तणाव सुरु आहे. लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चिनी जवानांना भारतीय सैनिकांनी रोखल्यानंतर येथे दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकले होते. तर चर्चेनंतर आपले जवान मागे हटतील, असे मान्य करूनही चीनने विश्वासघात केला होता आणि चिनी जवानांना रोखणाऱ्या भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यामध्ये भारताचे २० सैनिक शहिद झाले होते. यानंतर दोन्ही देशांमधील तणावात प्रचंड वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला नेपाळमधील चीनधार्जिणे सरकार मात्र चीनने त्यांच्या सीमेत घुसून भूभाग बळकावल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. नेपाळच्या दोन गावांवर चीनने सीमेवरील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या आड कब्जा केल्यावर नेपाळचे सरकार मूग गिळून आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. लॉबसांग सांगेय यांनी नेपाळला चीनबाबत इशारा दिला आहे.

”नेपाळने वेळीच लक्ष दिले नाही, तर १९४९ साली जे तिबेटच्या वाट्याला आले, तसेच भोग नेपाळच्या वाट्याला येतील.१९५९ साली तिबेटी जनतेने चीनच्या या आक्रमणाविरोधात केलेला विद्रोह सुद्धा चीनने लष्करी कारवाईने चिरडला. नेपाळ सावध झाला नाही, तर नेपाळही चीनच्या नावानेच ओळखले जाऊ लागेल, हे दिवस फार लांब नाहीत’,असे डॉ. सांगेय म्हणाले. ”चीन नेपाळच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संगनमत करून नेपाळला आपल्या सीमेत सामावून घेण्यावर काम करीत आहेत. तिबेटमध्ये जशी रस्त्याच्या कामाच्या नावाखाली चीनने घुसखोरी केली, तशीच अवस्था आज नेपाळच्या सीमा भागात आहे.’ असे डॉ. सांगेय यांनी बजावले. तसेच भारत-चीन सीमावाद सुटण्यासाठी तिबेटचा प्रश्न सुटायला हवा, असा दावा डॉ. सांगेय यांनी केला आहे.

दरम्यान, तिबेटियन युथ काँग्रेस या संघटनाने तिबेटला भारत आणि चीनमधील स्वतंत्र ‘बफर स्टेट’ घोषित करा, यासाठी मोहीम सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकी संसदेत तिबेटच्या स्वातंत्र्याचे विधेयक मांडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर तिबेटींयन तरुणांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात मोठी संघटना असलेल्या तिबेटियन युथ काँग्रेसने ही मोहीम सुरु केली आहे.

leave a reply