बिहार व उत्तरप्रदेशमध्ये वादळी पावसाने आणि वीज कोसळून १०७ जणांचा बळी

पटना- बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये वादळी पाऊस आणि वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत १०७ जणांचा बळी गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शाह यांनी यावर दुःख व्यक्त केले आहे. गुरुवारी बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. वादळी पावसादरम्यान वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत ८३ जणांचा बळी गेला. तर काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्याला याचा फार मोठा फटका बसला आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये जाहीर केले. तसेच उत्तरप्रदेशमध्ये जोरदार पाऊस आणि वीज कोसळून २४ जणांचा बळी गेला. तर १२ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देखील मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये दिले. दरम्यान, बिहारमध्ये रेड अलर्ट दिला असून २९ जूनपर्यंत बिहारमध्ये वादळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला. तसेच उत्तरप्रदेशला ही मुसळधार पावसाचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही राज्यातील जनतेला सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.

leave a reply