पेलोसी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीन तैवानवर नो-फ्लाय झोन लागू करील

- अमेरिकन वृत्तवाहिनीचा दावा

नो-फ्लाय झोनवॉशिंग्टन/तैपेई – अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी लवकरच तैवानला भेट देणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने अमेरिकेला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. उघडपणे उल्लेख केला नसला तरी, चीन तैवानवर नो-फ्लाय झोन लागू करील आणि तैवानच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या परदेशी विमानांना लक्ष्य करील, असा दावा अमेरिकन वृत्तवाहिनीने केला. तर तैवानने देखील चीनच्या हवाई हल्ल्यांविरोधात तयारी म्हणून सोमवारी ‘मिसाईल अलर्ट’ जारी करून तातडीचा सराव आयोजित केला.

तैवानच्या प्रश्नावरुन चीन अधिकच आक्रमक बनत चालला आहे. काही दिवसांपूर्वी बायडेन प्रशासनाने तैवानसाठी लष्करी सहाय्याची घोषणा केली होती. तर त्याआधी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिका तैवानला चीनविरोधी युद्धात सहाय्य करील, असे म्हटले होते. पण चीनच्या विरोधामुळे बायडेन प्रशासनाला तैवानबाबतचे आपले निर्णय बदलावे लागल्याचेही समोर आले होते. अशा परिस्थितीत, गेल्या आठवड्यात अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी तैवान दौऱ्यावर जाणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

नो-फ्लाय झोन1997 साली सभापती म्हणून न्युट गिंगरीच यांनी तैवानला भेट दिली होती. त्यामुळे 25 वर्षानंतर पहिल्यांदा अमेरिकन सभापती पेलोसी तैवानला भेट देणाऱ्या असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पेलोसी यांच्या कार्यालयाने याला दुजोरा दिलेला नाही. पण यामुळे खवळलेल्या चीनने थेट अमेरिकेला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. पेलोसी यांनी तैवानला भेट दिलीच तर लष्करी प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल, असे चीनने धमकावले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या लष्करी प्रत्युत्तराबाबत अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पण पेलोसी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, चीन तैवानवर नो-फ्लाय झोन लागू करू शकतो, असा दावा अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तवाहिनीने केला. त्याचबरोबर चीन तैवानच्या हवाईहद्दीत प्रवेश करणाऱ्या विमानांना लक्ष्य करील, तसेच आवश्यकता निर्माण झाल्यास चीन तैवानमध्ये आपली लढाऊ विमाने रवाना करील, अशी माहिती या वृत्तवाहिनीने बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसिद्ध केली. असे झाले तर बायडेन प्रशासनाचे नेमके काय उत्तर असेल, याबाबत प्रतिक्रिया देण्याचे सदर अधिकाऱ्याने टाळले.

मात्र याआधीही चीनने तैवानच्या हवाईहद्दीत आपली लढाऊ व बॉम्बर विमाने रवाना केली आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये चीनच्या शंभरहून अधिक विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीजवळून धोकादायकरित्या प्रवास केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. चीनची ही लष्करी आक्रमकता तैवानसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी धोकादायक ठरत असल्याची चिंता अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी व्यक्त केली. तर तैवानवर हल्ला चढविण्यासाठी चीन संधीच्या प्रतिक्षेत असल्याचा इशारा अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी दिला होता.

दरम्यान, चीनने तैवानवर हल्ला चढविलाच तर यामुळे आपली सुरक्षाही धोक्यात येईल, असे सांगून जपानने चीनला बजावले होते. तर ऑस्ट्रेलियाने देखील तैवानच्या सुरक्षेसाठी चीनविरोधात खडे ठाकण्याचे संकेत दिले होते.

leave a reply