जर्मनीने फ्रान्सच्या अण्वस्त्र कार्यक्रमात गुंतवणूक करायला हवी

- जर्मनीचे माजी राष्ट्राध्यक्ष वोल्फगँग शॉबल

फ्रान्सच्या अण्वस्त्र कार्यक्रमातबर्लिन/पॅरिस – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपच्या सुरक्षेसाठी जर्मनीने फ्रान्सच्या अण्वस्त्र कार्यक्रमात गुंतवणूक करायला हवी, असे आवाहन जर्मनीचे माजी राष्ट्राध्यक्ष वोल्फगँग शॉबल यांनी केले आहे. युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन तसेच प्रमुख नेत्यांनी सातत्याने अण्वस्त्रांचा वापर करण्याचा इशारे दिले होते. त्यामुळे युरोपिय देशांमध्ये अस्वस्थता असून सामरिक धोरणाची फेररचना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शॉबल यांचे वक्तव्य त्याचाच भाग दिसत आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष शॉबल यांनी काही दिवसांपूर्वी ‘वेल्ट ॲम सोन्टॅग’ला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी पुतिन यांनी युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत युरोपची सुरक्षाविषयक धोरणे बदलण्याची गरज असल्याची भूमिका मांडली. ‘पुतिन यांचे सहकारी सातत्याने आण्विक हल्ल्यांची धमकी देत आहेत. त्यामुळे आता युरोपला आण्विक प्रतिहल्ल्याची क्षमता बाळगण्याची आवश्यकता आहे. युरोपमध्ये फ्रान्सकडे अण्वस्त्र क्षमता आहे. जर्मनीने आपले हितसंबंध लक्षात घेऊन फ्रान्सच्या अणुकार्यक्रमात आर्थिक गुंतवणूक करायला हवी. त्याबदल्यात फ्रान्सबरोबर आण्विक प्रतिहल्ल्याची क्षमता विकसित करायला हवी’, असे आवाहन शॉबल यांनी केले.

फ्रान्सच्या अण्वस्त्र कार्यक्रमात‘नजिकच्या काळात जर्मनीने फ्रान्सबरोबर सामरिक सहकार्यावर भर द्यायला हवा. अण्वस्त्रांच्या वापराबाबत करारावरही विचार करणे आवश्यक आहे. फ्रान्स व जर्मनी हे शेजारी देश आहेत व अनेक मुद्यांवर त्यांच्यात चांगली जवळीक आहे. सामायिक धोक्यांबाबतही दोन्ही देशांमध्ये एकमत आहे’, असा सल्लाही जर्मनीच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी दिला. सध्याच्या काळात युरोपच्या संरक्षणक्षमतेचा विचार करायचा झाला तर त्यात आण्विक क्षमतेचा समावेश अपरिहार्य आहे, असा दावाही शॉबल यांनी केला.

युरोपिय महासंघाच्या सध्याच्या करारांनुसार नव्या आव्हानांचा मुकाबला करता येणार नाही. त्यामुळे नव्या धोरणाची गरज असून त्यासाठी जर्मनी, फ्रान्स व पोलंड यांनी पुढाकार घ्यायला हवा, याकडेही जर्मनीच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले. जगात सध्या नऊ देशांकडे अण्वस्त्रक्षमता असून त्यात युरोपातील फ्रान्स व ब्रिटन या देशांचा समावेश आहे. फ्रान्सकडे सुमारे 300 अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात येते. याव्यतिरिक्त अमेरिकेने आपली काही अण्वस्त्रे युरोपातील संरक्षणतळांवर तैनात केली आहेत.

leave a reply