आर्टिफिशल इंटेलिजन्ससह इतर प्रगत तंत्रज्ञानात चीनने अमेरिकेवर मात केली आहे

- अमेरिकेच्या माजी अधिकार्‍यांचा इशारा

चीनने अमेरिकेवरवॉशिंग्टन/बीजिंग – ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’सह इतर प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात चीनने अमेरिकेवर आधीच मात केली आहे, असा इशारा अमेरिकेचे माजी ‘चीफ सॉफ्टवेअर ऑफिसर’ निकोलस चायलन यांनी दिला. पुढील १०-१५ वर्षातही अमेरिका प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनवर आघाडी घेऊ शकणार नाही, असेही चायलन यांनी बजावले. यामागे सरकारी धोरणांबरोबरच अमेरिकेतील खाजगी कंपन्याही जबाबदार असल्याचा ठपका माजी अधिकार्‍यांनी ठेवला. चीनने गेल्याच दशकात महत्त्वाकांक्षी ‘मेड इन चायना पॉलिसी’ची घोषणा करून माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स यासारख्या क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढविण्याचे संकेत दिले होते.

निकोलस चायलन हे अमेरिकेच्या संरक्षण विभागात काम करणारे पहिले ‘चीफ सॉफ्टवेअर ऑफिसर’ म्हणून ओळखण्यात येतात. गेली तीन वर्षे ते अमेरिकेच्या हवाईदलात सायबरसुरक्षा व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात कार्यरत होते. मात्र अमेरिकेचे प्रशासन व संरक्षणदले सायबरसुरक्षा तसेच प्रगत तंत्रज्ञानाकडे फारशा गांभीर्याने लक्ष देत नसल्याने कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत त्यांनी अमेरिकेकडून तंत्रज्ञान क्षेत्राकडे होणार्‍या दुर्लक्षाचा मुद्दा उपस्थित केला.

‘पुढील १५ ते २० वर्षे अमेरिका प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात चीनशी स्पर्धादेखील करु शकणार नाही. स्पर्धेचा निकाल आताच लागलेला आहे आणि अमेरिकेला जिंकण्याची संधीही उरलेली नाही. प्रगत तंत्रज्ञानाच्या बळावर चीन जगाच्या भविष्यावर वर्चस्व गाजविणार आहे. माध्यमांच्या दृष्टिकोनापासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्वांचा यात समावेश असेल’, असा गंभीर इशारा निकोलस चायलन यांनी दिला. नव्या लढाऊ विमानांवर अधिक खर्च करण्यापेक्षा अमेरिकेने आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग व सायबर क्षमतांना अधिक प्राधान्य द्यायला हवे होते, असेही त्यांनी यावेळी बजावले.

चीनने अमेरिकेवरचीन आर्टिफिशल इंटेलिजन्ससारख्या क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करून पुढे जात असतानाच, अमेरिकेत या क्षेत्रातील नियम व नैतिकचा यांच्या चर्चा सुरू आहेत, याकडेही चायलन यांनी लक्ष वेधले. चीन अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि चीनच्या खाजगी कंपन्या सरकारशी पूर्ण सहकार्य करीत आहेत, असा दावाही त्यांनी केला. त्याचवेळी अमेरिकेतील ‘गुगल’सारख्या आघाडीच्या कंपन्या सरकारबरोबर काम करण्यास उत्सुकता दाखवित नाहीत, याकडेही माजी ‘चीफ सॉफ्टवेअर ऑफिसर’नी लक्ष वेधले.

गेल्या दशकभरात चीनने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी आघाडी घेतल्याचे समोर येत आहे. ‘५जी’पासून ते ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये चिनी कंपन्या व संशोधन मुसंडी मारत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. आर्थिक बळ व प्रभावाच्या जोरावर चीन आपले तंत्रज्ञान छोट्या व कमकुवत देशांना स्वीकारण्यास भाग पाडत असल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्याचवेळी खनिजे व इतर कच्च्या मालाच्या उत्पादनात मिळविलेल्या वर्चस्वाच्या जोरावर चीन इतर देशांमधील तांत्रिक प्रगतीला वेठीस धरण्याच्या हालचाली करीत असल्याचेही संकेत मिळत आहेत.

चीनचा हा प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेने हालचाली सुरू केल्या असल्या तरी त्याला खूपच उशिर झाल्याचे संकेत माजी ‘चीफ सॉफ्टवेअर ऑफिसर’ निकोलस चायलन यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.

leave a reply