उद्योगक्षेत्रावरील चीनची कारवाई या देशाच्या आर्थिक महासत्तापदासाठी धोकादायक ठरेल

- अमेरिकी विश्‍लेषकांचा इशारा

चीनची कारवाईवॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने आपल्याच मोठ्या कंपन्यांविरोधात सुरू केलेली कारवाई, आर्थिक महासत्ता म्हणून असलेल्या चीनच्या स्थानाला धक्का देणारी ठरते, असा इशारा अमेरिकी विश्‍लेषक रॉन इन्साना यांनी दिला आहे. चीन जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून ते स्थान मिळविण्यासाठी कारणीभूत ठरलेले ‘बिझनेस मॉडेल’च सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने धोक्यात आणल्याचे इन्साना यांनी बजावले आहे. जगभरातील चिनी कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण सुरू असून चार आघाडीच्या कंपन्यांना अवघ्या महिन्याभरात 300 अब्ज डॉलर्सहून अधिक फटका बसला आहे.

रॉन इन्साना हेज फंडचे माजी व्यवस्थापक व पत्रकार असून ‘सीएनबीसी’ वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात त्यांनी चिनी राजवटीच्या कारवाईवर टीकास्त्र सोडले आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने सुरू केलेल्या कारवाईमुळे चीनमधून परदेशी भांडवला मोठ्या प्रमाणात बाहेर जाण्यास सुरुवात होईल, असे इन्साना यांनी बजावले. गेल्या काही दशकात चीनमधील लाखो नागरिक गरीबीतून बाहेर पडले असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. यामागे बड्या चिनी कंपन्या, त्यांची कामगिरी, शेअरबाजारातील गुंतवणूक हे घटकही कारणीभूत आहेत. त्याला धक्का लागला तर त्याने चिनी नागरिकांचा आत्मविश्‍वास डळमळीत होईल, याकडे अमेरिकी विश्‍लेषकांनी लक्ष वेधले आहे.

चीनची कारवाईचीनचे माजी राष्ट्राध्यक्ष डेंग शाओपिंग यांनी देशात आर्थिक सुधारणांना सुरुवात केली होती. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सत्ता बनलेला चीन शाओपिंग यांच्या धोरणांचे परिणाम असून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची कारवाई त्यालाच धक्का देत आहे, असा इशारा इन्साना यांनी दिला. जिनपिंग सत्ता व पक्षाला आर्थिक संपन्नतेपेक्षा जास्त महत्त्व देण्याचा प्रयत्न करीत आहे, असा दावा अमेरिकी विश्‍लेषकांनी केला. या प्रयत्नांमुळेच चीनच्या आर्थिक महाशक्तीच्या स्थानाला जबरदस्त फटका बसत असल्याचे इन्साना यांनी बजावले.

गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या सत्ताधारी राजवटीने आपल्या कंपन्यांवर अमेरिकी शेअरबाजारातून माघार घेण्यासाठी दडपण टाकण्यास सुरुवात केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या चीनची कारवाईकंपन्यांविरोधात चीनने बडगा उगारला आहे. गेल्या काही महिन्यात ‘अलिबाबा’, ‘दिदी’, ‘टेन्सेंट’ यासारख्या कंपन्यांविरोधात कारवाईचा निर्णय घेऊन चीनने तंत्रज्ञान क्षेत्रासह आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांनाही मोठा धक्का दिला आहे. या धक्क्याचे तीव्र पडसाद शेअरबाजारातून उमटले. अमेरिकेतील चिनी कंपन्यांच्या समभागांसह चीन तसेच हाँगकाँगच्या शेअरबाजारंमध्ये मोठी घसरण झाली आहे.

या घसरणीनंतर आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून अनेक बड्या हेज फंड्सनी चीनमधील गुंतवणूक घटविण्यास सुरुवात केली आहे. चीनची राजवट मानवाधिकार, हाँगकाँगमधील कायदा, साऊथ चायना सीमधील कारवाई, हेरगिरी, सायबरहल्ले यासारख्या मुद्यांमुळे आधीच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष्य बनली आहे. या पार्श्‍वभूमीवर, गुंतवणूक क्षेत्रानेही चीनमधून माघारीचे संकेत दिल्यास चीनची अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते. चीन ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याने त्यात निर्माण झालेल्या अडचणी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम घडवू शकतात. त्यामुळे अमेरिकी विश्‍लेषकांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरत आहे.

leave a reply