तैवानवरचा चीनचा हल्ला ही भयंकर चूक ठरेल

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांचा इशारा

वॉशिंग्टन – ‘तैवानच्या विरोधात चीनची वाढत चाललेली आक्रमकता हा अमेरिकेच्या गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. पण आपले संरक्षण करण्याची क्षमता तैवानकडे आहे आणि अमेरिकेने ही बाब सुनिश्‍चित केली आहे. तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिका बांधिल आहे. बळाचा वापर करून पश्‍चिम पॅसिफिकमधली स्थिती बदलण्याचा प्रयत्न करून तैवानवर हल्ला चढविणे ही चीनची भयंकर चूक ठरेल’, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी दिला. चीनच्या युद्धनौकांनी तैवानच्या आखातात सराव करून इथले वातावरण स्फोटक बनविले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी चीनची ‘लिओनिंग’ विमानवाहू युद्धनौका पाच विनाशिकांसह तैवानच्या आखातात दाखल झाली होती. या युद्धनौकेने सदर क्षेत्रात सरावही केला होता. पुढच्या काळात याच क्षेत्रात असे सराव होतच राहतील, अशी घोषणाही चीनने केली होती. याद्वारे चीन तैवानला सज्जड इशारा देत असल्याचे समोर आले होते. तैवानचे स्वातंत्र्य आपल्याला मान्य नाही आणि कुठल्याही क्षणी चीन लष्करी कारवाई करून तैवान ताब्यात घेईल, अशा धमक्या चीनकडून दिल्या जात आहेत. ‘लिओनिंग’ विमानवाहू युद्धनौकेचा सराव म्हणजे ही धमकी प्रत्यक्षात उतरविण्याची तयारी असल्याचा संदेश चीनकडून देण्यात आला होता. यावर तैवानने जबरदस्त प्रतिक्रिया दिली होती.

चीनने हल्ला चढविलाच, तर तैवान अखेरपर्यंत हे युद्ध लढेल, असे सांगून तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी बजावले होते. चीन तैवानवर हल्ला चढविण्याची तयारी करीत असल्याचे अमेरिकी अधिकार्‍यांबरोबरील चर्चेतून समोर येत आहे. हे खरे असेल तर मग चीनबरोबरील युद्धात तैवान अखेरपर्यंत लढेल, असे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू म्हणाले होते. त्यांच्या या विधानांची चीनच्या सरकारी मुखपत्राने खिल्ली उडविली होती. जर चीनने तैवानवर हल्ला चढविला आणि युद्ध पेटले तर चीनसमोर तैवानचा निभाव लागणार नाही, असा दावा या चिनी मुखपत्राने केला होता.

याची दखल घेणे अमेरिकेला भाग पडले असून अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना तैवानवरील आक्रमणावरून चीनला इशारा दिला. तैवान आपले संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे, असे सूचक विधान परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी केले व अमेरिकेने तैवानला ही क्षमता प्राप्त करून दिलेली आहे, असे संकेतही यावेळी ब्लिंकन यांनी दिले. त्याचवेळी अमेरिकेत तैवानच्या सुरक्षेबाबत एकमत असून याबाबत तडजोड केली जाणार नाही, असेही परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी चीनला बजावले आहे.

दरम्यान, तैवान चीनच्या तुलनेत छोटा देश असला तरी या देशाकडे चीनला टक्कर देण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान व लष्करी क्षमता असल्याचे वेळोवेळी समोर आले होते. कधी ना कधी चीनच्या आक्रमणाचा आपल्याला सामना करावा लागेल, याची जाणीव असलेल्या तैवानने फार आधीपासून याची तयारी केली होती. त्यामुळे तैवानवर हल्ला चढवून हा देश ताब्यात घेण्याची योजना प्रत्यक्षात उतरविणे चीनसाठी अत्यंत अवघड बाब ठरू शकते. मुख्य म्हणजे तैवानच्या सुरक्षेसाठी कराराद्वारे बांधिल असलेल्या अमेरिकेलाही या युद्धात तैवानच्या बाजूने उतरणे भाग पडेल. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन चीनला याचीच जाणीव करून देत असल्याचे समोर येत आहे.

leave a reply