‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या आक्रमकतेला व्हिएतनामचे युद्धसरावाद्वारे प्रत्युत्तर

हनोई – फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात मिलिशिया जहाजे रवाना करून चीनने या क्षेत्रात तणाव निर्माण केला आहे. पण चीनच्या या कारवाईला व्हिएतनामने या क्षेत्रात पाणबुडीभेदी विनाशिका रवाना करून प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर व्हिएतनामच्या सागरी क्षेत्रातील चीनच्या जहाजांच्या हालचाली आमच्या सार्वभौमत्वाचे गंभीर उल्लंघन करीत असल्याची टीका व्हिएतनामने केली आहे.

साधारण दोन आठवड्यांपूर्वी चीनने फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात दोनशेहून अधिक मिलिशिया जहाजे तैनात केली. चीनच्या या दादागिरीविरोधात फिलिपाईन्सने आक्रमक भूमिका स्वीकारून हवाई तसेच सागरी गस्त सुरू केली आहे. फिलिपाईन्सने स्वीकारलेल्या या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेच्या युद्धनौका सदर सागरी क्षेत्रात दाखल झाल्या आहेत. तर चीनने देखील साऊथ चायना सीमध्ये आपली विमानवाहू युद्धनौका रवाना केल्यानंतर या क्षेत्रातील तणाव वाढला होता.

अशा परिस्थितीत, व्हिएतनामने देखील आपल्या सागरी हद्दीत युद्धसरावाचे आयोजन केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. व्हिएतनामच्या नौदलातील ‘कुआंग ट्रूंग’ या पाणबुडीविरोधी विनाशिकेने स्प्रार्टले द्विपसमुहांच्या क्षेत्रात हा सराव केला. व्हिएतनामच्या नौदलाचे हेलिकॉप्टर देखील या युद्धसरावात सहभागी झाले होते. या सरावानंतर व्हिएतनामने सदर विनाशिका व हेलिकॉप्टर याच क्षेत्रात तैनात केल्या आहेत. व्हिएतनामच्या या युद्धसरावावर चीनकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

चीनला आव्हान देणारा आग्नेय आशियातील व्हिएतनाम हा आघाडीचा देश म्हणून ओळखला जातो. याआधी १९७९ साली चीन आणि व्हिएतनाममध्ये संघर्ष झाला होता. यात चीनला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली होती. तर चीनप्रमाणे व्हिएतनामने देखील या सागरी क्षेत्रात कृत्रिम बेटाची निर्मिती करून तेथे आपले लष्करी तळ उभारल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, साऊथ चायना सीच्या संपूर्ण क्षेत्रावर आपला अधिकार असल्याचा दावा चीन करीत आहे. पण चीनच्या या अधिकारांना व्हिएतनामने आव्हान दिले आहे.

leave a reply