तैवानच्या मुद्यावरून अमेरिका व जपानविरोधात चीनची आगपाखड

तैपेई/वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकी नौदलाच्या सातव्या आरमारातील दोन युद्धनौकांनी शुक्रवारी तैवानच्या सागरी क्षेत्रातून गस्त घातली. त्याचवेळी जपान व तैवानच्या सत्ताधारी पक्षांमध्ये पहिल्यांदाच ‘सिक्युरिटी डायलॉग’ पार पडला असून त्यात चीनच्या धोक्याच्या मुद्यावर प्राधान्याने चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. अमेरिका व जपानकडून तैवानला करण्यात येणाऱ्या या वाढत्या सहकार्यामुळे चीन बिथरला असून, दोन्ही देशांविरोधात आगपाखड सुरू केली आहे. अमेरिकी युद्धनौकांनी घातलेली गस्त चिथावणी देणारी असल्याचा ठपका चीनच्या संरक्षण मंत्रालयाने ठेवला आहे. तर जपान व तैवानमध्ये झालेली चर्चा म्हणजे जपान अमेरिकेचे प्यादे म्हणून काम करीत असल्याचे निदर्शक असल्याची टीका चिनी प्रसारमाध्यमांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यात चीन तैवानच्या मुद्यावरून अधिकाधिक आक्रमक होताना दिसत आहे. चीनच्या या आक्रमतेला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेनेही मित्रदेशांच्या सहाय्याने आग्रही भूमिका घेतली असून हालचालींना अधिकच वेग दिला आहे. अमेरिकेच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानच्या मुद्यावर चीनला कोंडीत पकडण्यासाठी पावले उचलली होती. नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही हे धोरण कायम ठेवल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच बायडेन प्रशासनाने तैवानला तोफांसहित प्रगत संरक्षणयंत्रणा पुरविण्याची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ अमेरिकी युद्धनौकांची तैवाननजिकची गस्त अमेरिकेच्या आग्रही धोरणाचा भाग ठरतो.

अमेरिकेच्या सातव्या आरमाराचा भाग असणाऱ्या ‘युएसएस किड’ व ‘युएसजीएस मुन्रो’ यांनी शुक्रवारी तैवाननजिकच्या सागरी क्षेत्रातून गस्त घातली. ही गस्त मुक्त व खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिकेने दिलेल्या वचनबद्धतेचा भाग आहे, असे निवेदन सातव्या आरमाराकडून देण्यात आले. युएस नेव्हल इन्स्टिट्यूटने, साऊथ चायना सीमध्ये चीनकडून सुरू असलेल्या सरावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी नौदलाची गस्त महत्त्वाची ठरते, असा दावा केला आहे.

अमेरिकी नौदलाच्या या मोहिमेवर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. अमेरिकी नौदलाची गस्त ही चीनला चिथावणी देणारी घटना ठरते. या क्षेत्रातील शांतता व स्थैर्याला अमेरिकेचाच सर्वाधिक धोका असल्याचे ही घटना दाखवून देते. आम्ही या घटनेची तीव्र शब्दात निंदा करतो’, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने बजावले आहे.

अमेरिकी युद्धनौकांची गस्त सुरू असतानाच शुक्रवारी जपान व तैवानच्या सत्ताधारी पक्षांमध्ये ‘सिक्युरिटी डायलॉग’ पार पडल्याचे समोर आले आहे. ही चर्चा तैवानबरोबरील राजनैतिक सहकार्य भक्कम करण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो. या चर्चेत जपानच्या ‘एलडीपी’ व तैवानच्या ‘डीपीपी’ या पक्षांचे प्रत्येकी दोन संसद सदस्य सहभागी झाले होते. चीनचा धोका, सागरी सहकार्य, संरक्षण व व्यापार या मुद्यांवर तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. चीनच्या मुद्यावर जपानने तैवानबरोबर अशा रितीने स्वतंत्ररित्या चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

जपानचे तैवानबरोबरील हे वाढते सहकार्य चीनला चांगलेच खुपणारे ठरले आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी या मुद्यावरून जपानला धारेवर धरले आहे. तैवानबरोबर झालेली ही चर्चा म्हणजे जपान अमेरिकेचे प्यादे म्हणून काम करीत असल्याचे निदर्शक असल्याची टीका ‘ग्लोबल टाईम्स या सरकारी मुखपत्राने केली आहे. त्याचवेळी तैवानच्या मुद्यावर जपानने चीनविरोधात पावले उचलल्यास याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकीही दिली आहे. जपान-तैवानमधील वाढती जवळीक युद्ध छेडणारा घटक ठरु शकतो, असेही चिनी प्रसारमाध्यमांनी बजावले. चिनी माध्यमे ही धमकी देत असतानाच चीनच्या दोन गस्तीनौकांनी जपानच्या सेन्काकू आयलंडनजिकच्या क्षेत्रात घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, चीनच्या वाढत्या धोक्यांच्ा पार्श्‍वभूमीवर तैवानने आपल्या संरक्षणखर्चात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 साली तैवान संरक्षणदलांसाठी 16.89 अब्ज डॉलर्स खर्च करणार असल्याचे सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आले. यासंदर्भात मांडण्यात आलेल्या प्रस्तावात, लढाऊ विमानांच्या ताफ्यात भर टाकण्याचे संकेत देण्यात आले असून युद्धनौका, पाणबुड्या तसेच क्षेपणास्त्रांच्या साठ्यातही वाढ करण्यात येणार आहे.

leave a reply