इराणबरोबरची अणुचर्चा अपयशी ठरल्यास अमेरिका इतर पर्यायांचा विचार करील

- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे इस्रायलच्या पंतप्रधानांना आश्‍वासन

वॉशिंग्टन – ‘व्हिएन्ना येथे इराणबरोबर सुरू असलेल्या अणुकराराच्या वाटाघाटींना अमेरिका प्राधान्य देत आहे. या आघाडीवर अपयश मिळाले तर अमेरिका इतर पर्यायांचा विचार केला जाईल’, असे आश्‍वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत दिले. या अन्य पर्यायांबाबतची माहिती बायडेन प्रशासनाने जाहीर केली नाही, तर ‘इस्रायल म्हणजे आखातातील अमेरिका तर इराण म्हणजे भ्रष्टाचाराने नष्ट होणारी सोव्हिएत रशियाची राजवट आहे’, असे सांगून इस्रायलच्या पंतप्रधानांनी बायडेन यांना इराणवरून इशारा दिल्याचे दिसत आहे.

इराणचा अणुकार्यक्रम आणि आखातातील इतर घडामोडींवर चर्चा करण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गेली दहा वर्षे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या कारकिर्दीत अमेरिका आणि इस्रायलमधील संबंध मैत्रीपूर्ण नव्हते. यासाठी ओबामा प्रशासनाने इराणबाबत स्वीकारलेले धोरण जबाबदार ठरले होते. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका व इस्रायलमधील सहकार्य पूर्वपदावर आणण्यासाठी पंतप्रधान बेनेट यांच्या या अमेरिका दौऱ्याकडे पाहिले जात होते.

पंतप्रधान बेनेट आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील ही पहिली भेट होती. पण अफगाणिस्तानात झालेल्या आत्मघाती स्फोटांनंतर गुरुवारी आयोजित केलेली बैठक शुक्रवारसाठी पुढे ढकलली होती. व्हाईट हाऊसमध्ये पार पडलेल्या या बैठकीत इराणपासून ाअसलेला धोका आणि इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ न देण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेबाबत पंतप्रधान बेनेट यांच्याशी चर्चा झाल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी माध्यमांसमोर सांगितले. त्याचबरोबर अमेरिका अणुकरारासाठी इराणबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींना प्राथमिकता देत असल्याची घोषणा बायडेन यांनी केली. ही चर्चा अपयशी ठरली तर अमेरिका इतर पर्यायांचा विचार करील’, असे बायडेन म्हणाले.

‘राजकीय वाटाघाटींचा वापर करून इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ दिले जाणार नाही, याबाबत बायडेन ठामपणे सांगत आहेत. पण याने काम झाले नाही तर इतर पर्याय उपलब्ध आहेत’, अशी कठोर भूमिका इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी माध्यमांसमोर घेतल्याचे बोलले जाते. या बैठकीचे सारे तपशील समोर आलेले नाहीत. पण पंतप्रधान बेनेट यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासमोर इराणविरोधात ‘डेथ बाय थाऊजंड् कट्स’चे धोरण ठेवल्याचा दावा अमेरिकी वृत्तसंस्थेने इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केला.

इराणवर एकच थेट हल्ला चढविण्यापेक्षा वेगवेगळ्या लष्करी व राजनैतिक आघाड्या उघडण्याचे पर्याय इस्रायलच्या पंतप्रधानांनी सुचविले. यावेळी पंतप्रधान बेनेट यांनी इस्रायलची तुलना 80च्या दशकातील महासत्ता अमेरिका आणि इराणच्या राजवटीची तुलना सोव्हिएत रशियाशी करून निराळे संकेत दिल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर आखातातील इराणची आक्रमकता मोडून काढायची असेल तर अमेरिकेने इराक-सिरियातून सैन्यमाघार घेऊ नये, असे बेनेट यांनी सुचविले.

अफगाणिस्ताननंतर बायडेन इराकमधून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे माघारी घेणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलच्या पंतप्रधानांनी हे आवाहन केल्याचे दिसते.

leave a reply