चीनचा नवा सागरी कायदा शेजारी देशांना युद्धाची धमकी देणारा

-फिलिपाईन्स व व्हिएतनामचे चीनवर ताशेरे

मनिला/हनोई – ‘ईस्ट तसेच साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात प्रवास करणार्‍या जहाजांवर थेट कारवाई करण्याची परवानगी देणार्‍या चीनच्या नव्या कायद्यावर शेजारी आग्नेय आशियाई देशांनी संताप व्यक्त केला आहे. चीनचा हा कायदा शेजारी देशांना थेट युद्धाची धमकी देणारा असल्याचा आरोप फिलिपाईन्सने केला आहे. तर चीनच्या या कायद्याची पर्वा न करता इतर देशांनी आंतरराष्ट्रीय नियमानुसार या सागरी क्षेत्रातून वाहतूक करावी, असे आवाहन व्हिएतनामने केले आहे. दरम्यान, फिलिपाईन्स व व्हिएतनामसह साऊथ चायना सी क्षेत्रातील छोट्या देशांच्या मागे अमेरिका उभी राहणार असल्याचे बायडेन प्रशासनाने नुकतेच स्पष्ट केले होते.

दहा दिवसांपूर्वी चीनच्या ‘नॅशनल पिपल्स काँग्रेस’च्या बैठकीत तटरक्षकदलासाठी विशेष कायदा संमत करण्यात आला. यानुसार चीनच्या तटरक्षक दलाला चीन दावा करीत असलेल्या सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्‍या परदेशी जहाजांवर शस्त्राचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तटरक्षक दलाला हे अधिकार देऊन चीन ईस्ट व साऊथ चायना सीमधील आपले प्रभावक्षेत्र वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचा इशारा अमेरिकी अभ्यासगटाने दिला होता.

चीनच्या या कायद्यावर फिलिपाईन्स व व्हिएतनाम या देशांकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘आपल्या कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात युद्ध पुकारण्याची धमकीच चीनने या कायद्याद्वारे दिली आहे. तर या कायद्याचे पालन करणारे देश चीनची शरणागती पत्करतील’, अशी टीका फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री थिओडोर लॉक्सिन ज्युनिअर यांनी केली. चीनच्या या कायद्याचे फिलिपाईन्स पालन करणार नाही, अशी उघड भूमिका घेण्याचे परराष्ट्रमंत्री लॉक्सिन यांनी टाळले. पण अमेरिका आणि फिलिपाईन्समध्ये संरक्षणविषयक सहकार्य असल्याची आठवण परराष्ट्रमंत्री लॉक्सिन यांनी करून दिली.

व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ‘ली थी थू हांग’ यांनी चीनचा नामोल्लेख टाळून परदेशी जहाजांनी आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे पालन करून या क्षेत्रातून वाहतूक करावी, असे म्हटले आहे. त्याचबरोबर, पॅरासेल आणि स्प्रार्टले द्विपसमुहांवरील व्हिएतनामचा सार्वभौम अधिकार आहे. याचे ऐतिहासिक पुरावे आणि कायदेशीर कागदपत्रे देखील व्हिएतनामकडे असल्याचे हांग म्हणाल्या. त्याचवेळी व्हिएतनामच्या सागरी क्षेत्राचे कुणीही उल्लंघन करू नये, अशा शब्दात हांग यांनी चीनला फटकारले.
दरम्यान, ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या आक्रमकतेला आग्नेय आशियाई देशांकडून तगडे आव्हान मिळू लागले आहे. काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाच्या तटरक्षकदलाने चीनच्या टँकरवर कारवाई करून चिनी कर्मचार्‍यांना अटक केली होती.

leave a reply