इराणबरोबरील अणुकराराच्या मुद्यावर अमेरिका आणि मित्रदेशांमध्ये मतभेद

वॉशिंग्टन/तेहरान – इराणबरोबरच्या अणुकरारावरून अमेरिका आणि फ्रान्स या मित्रदेशांमधील मतभेद समोर येऊ लागले आहेत. अण्वस्त्रनिर्मितीच्या दिशेने पावले टाकणाऱ्या इराणच्या अणुकराराबाबत यापुढे अधिक कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन करीत आहेत. पण अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इराणशी अणुकरार करण्याच्या दिशेने पावले टाकू लागले आहेत. 2015 सालच्या अणुकरारात बदल न करताच पुढे जाण्याचा पर्यायही बायडेन प्रशासनाने खुला ठेवल्याचे संकेत मिळत असल्याचे अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.

गेल्या दोन आठवड्यांमध्ये इराणने आपल्या अणुकार्यक्रमाचा वेग तीव्र केला आहे. 2015 सालच्या अणुकराराचे उल्लंघन करून इराणने युरेनियमचे संवर्धन 20 टक्क्यांपर्यंत नेण्याची घोषणा केली. तसेच फोर्दो अणुप्रकल्प देखील कार्यान्वित केला व लवकरच सेंट्रिफ्युजेस देखील कार्यान्वित करणार असल्याचे इराणने जाहीर केले आहे. या हालचाली इराणला अण्वस्त्रनिर्मितीजवळ नेणाऱ्या असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संघटना व विश्‍लेषक करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी माध्यमांशी बोलताना यावरून इशारा दिला होता. ‘इराणचा अणुकार्यक्रम धोकादायक मार्गाने पुढे जात आहे. वेळीच रोखले नाही तर इराण अण्वस्त्रसज्जतेच्या जवळ पोहोचेल’, याची जाणीव मॅक्रॉन यांनी करून दिली होती. तसेच 2015 साली झालेली चूक सुधारून इराणबरोबरच्या अणुचर्चेमध्ये या क्षेत्रातील सौदी अरेबिया व इतर अरब मित्रदेशांनाही सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव मॅक्रॉन यांनी ठेवला होता.

पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी हालचाली अधिक तीव्र करू शकतात, असा दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिवन यांनी केला आहे. ‘आखातातील इराणच्या कुरापतींचा मुद्दा बाजूला ठेवून फक्त अणुकरार करण्याला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल. कारण इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या अधिकाधिक जवळ पोहोचत चालला आहे’, असे सुलिवॅन यांनी म्हटले आहे.

इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून दूर ठेवण्यासाठी, नव्या अटींसह अणुकरार करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करील. त्याचबरोबर मूळ करार पुन्हा तयार करण्याचा पर्यायही खुला ठेवल्याचे संकेत सुलिवन यांनी दिल्याची माहिती अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राने दिली आहे. यामुळे इस्रायल तसेच सौदी अरेबिया व इतर आखाती देशांनी अमेरिकेच्या नव्या प्रशासनाबाबत व्यक्त केलेला संशय खरा ठरू लागल्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिकेने इराणबरोबर पुन्हा अणुकरार केलाच, तर त्याचे भयावह परिणाम समोर येतील. इस्रायल स्वबळावर इराणवर हल्ला चढविल, अशी धमकी इस्रायलने दिली आहे. तर सौदी अरेबियाने देखील इराणबरोबर अणुकरार करताना आपल्याला विश्‍वासात घेतले जावे, अशी मागणी अमेरिकेकडे केली होती. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनीही ही मागणी उचलून धरल्याचे दिसत आहे.

केवळ फ्रान्सच नाही तर ब्रिटन व जर्मनीने देखील इराणच्या अणुकार्यक्रमावर चिंता व्यक्त करून हा देश 2015 सालच्या अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप केला होता. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबरोबरील अणुकरार पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला, तर आखाती क्षेत्रात त्याचे पडसाद उमटू शकतात. त्याचवेळी अमेरिकेच्या विरोधी पक्षांकडूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

leave a reply