अमेरिकेतील जमिनी व मालमत्तांवरील चीनचा ताबा चिंताजनक ठरतो

-फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसँटिस

China-occupation-of-US-landsवॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेतील आघाडीचे राज्य म्हणून ओळखण्यात येणाऱ्या फ्लोरिडातील जमीन व मालमत्तांची चिनी कंपन्यांकडून सुरू असलेली खरेदी चिंताजनक बाब असल्याचा इशारा गव्हर्नर रॉन डेसँटिस यांनी दिला. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीशी संबंध असलेल्या कंपन्यांनी फ्लोरिडा प्रांतात हजारो एकर जागा खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. आपण लवकरच यावर निर्बंध घालणारे विधेयक दाखल करणार असल्याचे संकेतही गव्हर्नर डेसँटिस यांनी दिले. 2019 सालच्या अहवालानुसार, चीनने अमेरिकेतील जवळपास दोन लाख एकरची शेतजमीन खरेदी केली आहे.

US-lands‘चिनी कंपन्यांना अमेरिकेत जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळता कामा नये. या कंपन्यांचे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीशी संबंध आहेत. कंपन्या जे समोर दाखवितात त्याच गोष्टी खऱ्या असतील, असे नाही. ही एक खूप मोठी समस्या आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी मोठ्या प्रमाणात वर्चस्व मिळविण्याचे प्रयत्न करीत आहे. ही बाब फक्त त्यांच्या लष्करी सामर्थ्याशी निगडीत नाही. चीनने अमेरिकेतील आपला प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढविला आहे’, असा इशारा फ्लोरिडाच्या गव्हर्नरनी दिला.

China-occupation-US-landsकाही आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या ‘नॉर्थ डाकोटा’ प्रांतात फुफेंग ग्रुप या चिनी कंपनीने 300 एकर्सची जागा खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले होते. ही जागा ‘ग्रँड फोर्क्स’ या अमेरिकी हवाईतळाजवळ आहे. हवाईदलातील वरिष्ठ अधिकारी मेजर जेरेमी फॉक्स यांनी एक मेमोत याचा उल्लेख केला होता. त्यानंतर अमेरिकेतील संसद सदस्य तसेच स्थानिक प्रतिनिधींनीही यावर चिंता व्यक्त केली होती. चिनी कंपनीने त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळले असले तरी हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर फ्लोरिडाचे गव्हर्नर डेसँटिस यांनी सदर मुद्दा उपस्थित केल्याने त्याकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘सीएनएन’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीने ‘हुवेई‘ या चिनी कंपन्यांच्या ‘सेल टॉवर्स’मधून अमेरिकी अण्वस्त्रांची हेरगिरी होत असल्याचे वृत्त्त प्रसिद्ध केले होते. त्यापूर्वी अमेरिकी तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ नेही अमेरिकेतील चीनच्या वाढत्या कारवायांकडे लक्ष वेधले होते.

leave a reply