‘एस-400’ची नवी स्क्वाड्रन चीन सीमेनजिकतैनात करणार

नवी दिल्ली – रशियाकडून खरेदी करण्यात आलेल्या ‘एस-400′ या हवाई सुरक्षा यंत्रणेची दुसरी स्क्वाड्रन लवकरच भारताला सुपूर्द केली जाणार आहे. ‘एस-400’ची ही स्क्वाड्रन चीन सीमेजवळ पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसात एलएसीजवळ चीनच्या विमानांच्या हालचाली वाढल्या आहेत. लडाखमधील तणावावरून भारत-चीनमध्ये चर्चेच्या 16 फेऱ्या झाल्या आहेत. मात्र यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. त्याचवेळी चीनकडून सीमेनजीक हवाई हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लडाखमध्ये ‘एस-400’च्या तैनातीचे वृत्त महत्त्वाचे ठरते.

S-400-missileभारताला ‘एस-400’ची दुसरी स्क्वाड्रन सुपूर्द करण्याच्या हालचाली रशियाकडून सुरू झाल्या आहेत. याआधीच ही यंत्रणा भारताला मिळणे अपेक्षित होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात युक्रेन युद्धाला तोंड फुटले. फेब्रुवारी महिन्यात युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यादांच एस-400 ची दुसरी स्क्वाड्रन भारताला सोपविण्यासाठी रशियाने हालचाली सुरू केल्या आहेत. जहाज आणि विमानांच्या माध्यमातून ‘एस-400′ यंत्रणा भारतात आणली जाईल.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ‘एस-400’ची पहिली स्क्वाड्रन रशियाने भारताला सोपविली होती. रशियाकडून मिळालेली ही पहिली यंत्रणा पंजाबमध्ये तैनात करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून असलेल्या हवाई धोक्याला ओळखून भारताने येथे एस-400 यंत्रणा तैनात करून पाकिस्तान आघाडीवरील आपली हवाई सुरक्षा भक्कम केली होती. आता पुढील स्क्वाड्रन थेट लडाखमध्ये तैनात केली जाणार असल्याचे दावे अधिकाऱ्याच्या हवाल्याने माध्यमातून करण्यात आले आहेत.

गेल्या काही काळात एलएसीवर चीनच्या हवाई हालचाली वाढल्या आहेत. लडाखबरोबर अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी विमाने हवाई सीमेच्या अगदी जवळून उडताला पहायला मिळाली आहेत. तसेच काही विमानांनी ‘नो फ्लाय झोन’ क्षेत्रात घुसल्याच्या बातम्या आल्या होत्या. 28 जून रोजी लडाखमध्ये चिनी विमानांनी अशीच घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या विमानांना भारतीय वायुसेनेने चिनी विमानांना इशारा दिला होता. हा मुद्दा नंतर चीनकडे स्वतंत्रपणे उपस्थितही करण्यात आला होता.

चीनने आपल्या सीमेत गेल्या काही वर्षात पद्धतशीरपणे हवाईतळ उभारले आहे. तसेच धावपट्ट्या आणि विमानांना इंधन भरण्यासाठी सुविधाही विकसित केल्या आहेत. भारतीय सीमेपासून जवळ हे हवाईतळ उभे रहिले आहेत. येथे लढाऊ विमानांचीही मोठ्या प्रमाणावर तैनाती झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत चीनच्या आघाडीवरील हवाई सुरक्षाही मजबूत करीत आहे. ‘एस-400’ची तैनाती ही याचाच भाग आहे. याआधी भारतीय बनावटींच्या हवाई सुरक्षा यंत्रणांची तैनाती एलएसीजवळ करण्यात आली आहे. ‘एस-400’च्या तैनातीनंतर चीनकडून होणाऱ्या हवाई हल्ल्यांना रोखण्याची जबरदस्त क्षमता भारतीय संरक्षणदलांना प्राप्त होईल. त्यामुळे लडाखमध्ये या यंत्रणेच्या नव्या स्क्वाड्रन तैनात करण्यात येणार असल्याचे वृत्त महत्त्वाचे ठरते.

leave a reply