चीनच्या प्रवासी विमान कंपन्याच्या कर्मचार्‍यांकडून अमेरिकेत हेरगिरी

- ‘होमलॅण्ड सिक्युरिटी’ विभागाचा आरोप

हेरगिरीवॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या सरकारी प्रवासी विमान कंपन्यांचे कर्मचारी अमेरिकन यंत्रणांवर हेरगिरी करीत असल्याचा दावा ‘होमलॅण्ड सिक्युरिटी’ विभागाने केला आहे. चीनच्या ‘एअर चायना’ तसेच ‘शिआमेन एअरलाईन्स’च्या कर्मचार्‍यांचा हेरगिरीत सहभाग आढळल्याचे ‘होमलॅण्ड सिक्युरिटी’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. २०१९ साली एअर चायनाची कर्मचारी असणार्‍या यिंग लिनला संयुक्त राष्ट्रसंघटनेतील चीनच्या लष्करी अधिकार्‍यांसाठी हेरगिरी करताना पकडण्यात आले होते. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने यापूर्वी विद्यार्थी, संशोधक, उद्योजक तसेच चिनी कंपन्यांमार्फतही अमेरिकेसह युरोपिय देशांमध्ये हेरगिरी केल्याची प्रकरणे उघड झाली होती.

अमेरिकेतील ‘याहू न्यूज’ या वेबसाईटने चिनी कर्मचार्‍यांच्या हेरगिरीसंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेतील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘डिपार्टमेंट ऑफ होमलॅण्ड सिक्युरिटी’ने प्रसिद्ध केलेल्या एका इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये चीनच्या हेरगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे. या विभागाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सबटल फॉक्स’ नावाच्या मोहिमेदरम्यान चिनी कर्मचार्‍यांची हेरगिरी उघड झाली. लॉस एंजेलिस विमानतळावर अमेरिकी यंत्रणा चिनी संशोधकांची चौकशी करीत असताना चीनच्या विमान कंपन्यांचे कर्मचारी चौकशी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळले. अमेरिकी यंत्रणा चिनी संशोधक व नागरिकांना कोणत्या स्वरुपाचे प्रश्‍न विचारतात आणि ही प्रक्रिया कशी हाताळली जाते, यासंदर्भातील माहिती मिळविण्याचे प्रयत्न ‘एअर चायना’च्या कर्मचार्‍यांनी केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

हेरगिरीयापूर्वीही अमेरिकी यंत्रणांच्या विविध अहवालांमधून अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी ह्युस्टनमधील चिनी वाणिज्य दूतावासाच्या अधिकार्‍यांना ‘एअर चायना’च्या कर्मचार्‍यांनी खोट्या कागदपत्रांसाठी मदत केल्याचे सांगण्यात येते. चीनचीच सरकारी विमानकंपनी असणार्‍या ‘शिआमेन एअरलाईन्स’च्या कर्मचार्‍यांनी एका चिनी संशोधिकेला तिच्याकडे असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील माहिती नष्ट करण्याची सूचना दिल्याचे प्रकरणही समोर आले होते. न्यूयॉर्कमधील विमानतळावर काम करणार्‍या यिंग लिन या ‘एअर चायना’च्या महिला कर्मचार्‍यावर २०१९ साली कारवाई करण्यात आली होती.

हेरगिरीयिंगने संयुक्त राष्ट्रसंघटनेतील चिनी अधिकार्‍यांसाठ कुरिअर म्हणून काम केल्याचे उघड झाले होते. ‘एअर चायना’ ही कंपनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन फॉक्स हंट’साठी काम करीत असल्याची माहितीही अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेतील अनेक चिनी नागरिकांना जबरदस्तीने तसेच फसवून चीनमध्ये नेण्यात आले होते. चीनच्या विमानकंपन्या सत्ताधारी राजवटीसाठी आऊटपोस्ट म्हणून काम करीत असल्याचेही अमेरिकी अधिकार्‍यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील चिनी दूतावासाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. ‘अमेरिकेने चिनी कंपन्यांवर हेरगिरीचे आरोप करणे अनैतिक व अयोग्य बाब ठरते. परदेशात काम करताना स्थानिक कायदे व नियमांचे पालन करावे, असे निर्देश चिनी कंपन्यांना देण्यात आले आहेत’, असे दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंगयु यांनी स्पष्ट केले. ‘एअर चायना’ कंपनीने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

२०१८ साली अमेरिकेच्या न्याय विभागाने चीनकडून सुरू असणार्‍या हेरगिरीच्या कारवायांचा शोध घेण्यासाठी ‘चायना इनिशिएटिव्ह’ नावाचा उपक्रम हाती घेतला होता. गेल्या वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हेरगिरीच्या आरोपांवरून चीनचा ह्युस्टनमधील दूतावास बंद करण्याचे आदेशही दिले होते.

leave a reply