कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या ‘इंडो-पॅसिफिक’मधील वर्चस्वाला धक्का बसला

- ऑस्ट्रेलियन अभ्यासगटाचा दावा

वर्चस्वाला धक्काकॅनबेरा/वॉशिंग्टन/बीजिंग – कोरोनाच्या साथीमुळे चीनच्या ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील वर्चस्वाला धक्का बसल्याचा दावा ऑस्ट्रेलियन अभ्यासगट ‘लोवी इन्स्टिट्यूट’ने केला. त्याचवेळी या क्षेत्रातील अनिश्‍चितता सातत्याने वाढत असून त्यातून युद्धाचा भडका उडण्याचा धोका आहे, असा इशाराही दिला आहे. ऑस्ट्रेलियन अभ्यासगटाने ‘एशिया पॉवर इंडेक्स’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यानुसार वर्तमानात अमेरिका या क्षेत्रातील शक्तिशाली सत्ता असल्याचे नमूद केले आहे.

ऑस्ट्रेलियातील आघाडीचा अभ्यासगट असणार्‍या ‘लोवी इन्स्टिट्यूट’ने ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील २६ देश व क्षेत्रांचा आढावा घेतला आहे. त्या आधारावर तयार केलेल्या अहवालात अमेरिका आजही या क्षेत्रातील आघाडीची सत्ता असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेपाठोपाठ चीन, जपान, भारत, रशिया व ऑस्ट्रेलिया यांचा ‘इंडो-पॅसिफिक’मधील प्रमुख सत्ता म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

वर्चस्वाला धक्कागेल्या काही वर्षात चीनचे वर्चस्व वाढत असल्याचे व अमेरिकेचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र दिसत होते. पण गेल्या वर्षभरात चीनची एकत्रित शक्ती हळुहळू कमी होत चालल्याचे समोर येत आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब ठरते, असे अभ्यासगटाचे संचालक हर्व लेमाहिउ यांनी स्पष्ट केले. चीनचा राजनैतिक तसेच सांस्कृतिक पातळीवरील प्रभाव कमी होत असून आर्थिक क्षमता तसेच भविष्यातील साधनसंपत्तीची उपलब्धता यात घट झाल्याचे आढळले आहे.

चीनची क्षमता कमी होत असतानाच अमेरिकेचा राजनैतिक प्रभाव व आर्थिक क्षमता वाढल्याचे ऑस्ट्रेलियन अभ्यासगटाने म्हंटले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सध्या तणाव टोकाच्या स्थितीला पोहोचला असून कोणत्याही कारणामुळे संघर्षाचा भडका उडू शकतो. एखाद्या मुद्यावरून अमेरिका व चीनमध्ये झालेले गैरसमज हा घटक देखील युद्धास कारणीभूत ठरु शकतो, असा इशारा ‘लोवी इन्स्टिट्यूट’ने दिला. ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये सध्या जबरदस्त शस्त्रस्पर्धा सुरू असल्याकडेही संचालक हर्व लेमाहिउ यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी युद्ध भडकल्यास फक्त दोन महासत्ता नाही तर भारत व जपानसह व्हिएतनामसारखे छोटे देशही त्यात खेचले जातील, असे अभ्यागटाने बजावले आहे.

leave a reply