उत्तराखंडच्या सीमाभागात चिनी लष्कराची घुसखोरी

- भारतीय सैन्य येण्याच्या आधीच पळ काढला

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवर भारतीय सैन्यासमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरलेल्या चीनच्या लष्कराने गमावलेली प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नव्याने धडपड सुरू केली आहे. गेल्या महिन्यात चीनने उत्तराखंडच्या बाराहोती येथील भारतीय सीमेत घुसखोरी करून इथल्या एका पुलाची नासधूस केली. घुसखोरी करणार्‍या या चिनी जवानांची संख्या शंभराच्या आसपास होती व ते इथे घोड्यावरून असल्याचे सांगितले जाते. मात्र भारतीय सैन्य इथे दाखल होण्याच्या आधीच चीनच्या जवानांनी इथून काढता पाय घेतला. यानंतर भारतीय सैन्याने इथली तैनाती व गस्त वाढविली आहे.

लडाखच्या एलएसीवर शांतता प्रस्थापित करण्याची भाषा चीन करीत आहे. तसेच सीमावादाचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होता कामा नये, असे सांगून चीन भारताकडून अधिकाधिक व्यापारी सवलती उपटण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी लडाखच्या एलएसीवर भारतीय सैन्यासमोर तग न धरू शकलेला चीन वेगवेगळ्या मार्गाने भारतावरील लष्करी दडपण वाढवून आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी आसुसलेला आहे. भारतीय सैन्य व वायुसेनेने लडाखच्या गलवानमधील संघर्षानंतर एलएसीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. त्यामुळे चिनी लष्कराला आपल्या कुरापतखोर कारवायांना वेसण घालावे लागले. पण ३० ऑगस्ट रोजी चिनी लष्कराच्या सुमारे शंभर जवानांनी उत्तराखंडच्या बाराहोती इथे घुसखोरी केली.

या क्षेत्रात भारतीय सैनिकांची तैनाती नाही, हे हेरून चीनच्या जवानांनी इथे शिरकाव करून इथल्या एका पुलाची नासधूस केली. जवळपास तीन तास चीनचे हे जवान इथे होते. हे जवान घोड्यावरून इथे आल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र भारतीय सैनिक या ठिकाणी दाखल होण्याच्या आधीच चीनच्या जवानांनी काढता पाय घेतला. त्यामुळे चिनी जवानांना भारतीय सैनिकांचा सामना करावा लागला नाही. भारताचे सैनिक इथे येण्याच्या आधीच पळ काढण्याची तयारी चीनच्या जवानांनी ठेवलेली होती, हे याद्वारे समोर आले आहे.

भारतीय सैन्याने याची गंभीर दखल घेतली असून या क्षेत्रात तैनाती करण्यात आली आहे. तसेच इथली गस्तही वाढविण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चीनने लडाख तसेच एलएसीच्या इतर भागांजवळील तैनाती वाढविल्याच्या बातम्या येत आहेत. काही ठिकाणी चीनच्या लष्कराने रशियाकडून खरेदी केलेल्या ‘एस-४००’ या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या बॅटरीज् तैनात केल्या आहेत. याबरोबरच एलएसीजवळील भागात पक्की बांधकामे करून चीनचे लष्कर आपल्या जवानांना इथे कायमस्वरुपी तैनात करणार असल्याचे संकेत देत आहे.

भारतीय सैन्याने तोडीस तोड तैनाती करून चीनला प्रत्युत्तर दिले आहे. वारंवार प्रयत्न करूनही चीनच्या लष्कराला भारतीय सैन्याला मागे ढकलणे शक्य झाले नव्हते. तर गलवानच्या संघर्षात भारतीय सैनिकांनी केलेल्या पराक्रमाची सार्‍या जगाने दखल घेतली होती. चीनला टक्कर देण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे आहे व चीनला या आघाडीवर भारतासमोर झुकावे लागल्याचेही सार्‍या जगाने पाहिले होते. यानंतर आपले सामर्थ्य सिद्ध करून आपण भारतावर वर्चस्व गाजवू शकतो, हे दाखविण्यासाठी चीन धडपडत आहे. या आघाडीवर अपयश आले म्हणून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारतीय सीमेलगतच्या चिनी लष्कराचे नेतृत्त्व करणार्‍या तीन अधिकार्‍यांची बदली केली होती. यातून चीनची अस्वस्था अधिकच ठळकपणे समोर आली.

३० ऑगस्ट रोजी घुसखोरी करताना देखील चीनच्या लष्कराने भारतीय सैन्याशी आपला सामना होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेऊनच घुसखोरी केल्याचे दिसते. यामुळे चीनचे लष्कराकडे लढण्याची धमक नसून हे लष्कर कचखाऊ असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आलेली आहे.

leave a reply