चीनच्या लष्कराने युद्धासाठी सज्ज व्हावे

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आदेश

बीजिंग/नवी दिल्ली – चीनच्या लष्कराने युद्धासाठी सज्ज व्हावे, असे आदेश राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत. चीनचा भारताबरोबरील सीमावाद चिघळला असून दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांसमोर खडे ठाकले आहे. त्यामुळे भारतीय माध्यमे चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या युद्ध सज्जतेचा आदेशाचा भारताशी संबंध जोडत आहेत. भारताच्या पंतप्रधान व संरक्षण मंत्र्यांनी संरक्षणदल प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक बोलावून देशाच्या सज्जतेचा आढावा घेतल्यानंतर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या लष्कराला हे आदेश दिले आहेत, याकडेही भारतीय माध्यमे लक्ष वेधत आहेत. मात्र एकाच वेळी तैवान, हाँगकाँग व साऊथ चायना सी या सर्वच ठिकाणी चीन आक्रमक भूमिकेत असल्याने चीनच्या राष्ट्राध्यक्षांना या युद्धसज्जतेचे आदेश द्यावे लागत असल्याचे दिसत आहे.

चिनी संसदेचे वार्षिक सत्र संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपला देश सार्वभौमत्वाच्या आघाडीवर अजिबात तडजोड करणार नाही असे सांगून चिनी लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. अत्यंत बिकटातील बिकट स्थितीचा विचार करून युद्धासाठी सज्ज व्हा, युद्धाची तयारी ठेवा असे जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला बजावले आहे वेगळ्या शब्दात एकाच वेळी अनेक आघाड्यांवर युद्ध करावे लागेल याची तयारी ठेवून चिनी लष्कराने सज्जता वाढवावी असा संदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष देत आहेत. चीनच्या सर्वच सरकारी मुखपत्रांनी त्यांच्या या आदेशाची बातमी उचलून धरली आहे.

कोरोनाव्हायरसच्या साथीचा उगम चीनमधून झाला व चीनने वेळीच याची माहिती उघड केली असती तर अनर्थ टळला असता असा आरोप अमेरिका करीत आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व जपान हे देश देखील वेगवेगळ्या शब्दात चीनवर असेच आरोप करीत असून या साथीची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत आहेत. १९८९ साली तिआनमिन चौकात लोकशाहीची मागणी करणाऱ्या तरुणांवर केलेल्या कारवाई नंतर चीन जेवढा जगभरात अप्रिय बनला नव्हता तेवढी आप्रियता कोरोना व्हायरसमुळे चीनच्या वाट्याला आल्याचे दावे चीनचे अभ्यासगट करीत आहेत. अमेरिकेसारखा देश याचा फायदा घेईल व चीनला एकाचवेळी अनेक लष्करी आघाड्यांवर तोंड द्यावे लागेल अशी चिंता चीनचे सामरिक विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

यामुळे चीनने आपल्या आक्रमकतेत अधिकच वाढ केली असून साऊथ चायना सी क्षेत्रात चिनी नौदलाच्या कारवाया अधिकच तीव्र बनल्या आहेत. त्याचवेळी तैवानचा ताबा घेण्यासाठी लष्करी कारवाई केली जाऊ शकते असे धमकीचे सूर चीनकडून लावले जात आहेत. तर हाँगकाँग वरील आपली पकड अधिक भक्कम करण्यासाठी चीनने नवे कायदे लागू करण्याची तयारी केली आहे.

या कारवाया सुरू असताना चीन हिंदी महासागर क्षेत्रातही आपल्या नौदलाचा वावर वाढवीत आहे. त्याचवेळी भारताच्या सीमेत घुसखोरी करून चीन भारतावरील दडपण वाढवू पाहात आहे. मात्र चीनच्या या घुसखोरीला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळत आहे. भारताच्या हवाई क्षेत्रात हेलिकॉप्टर्स घुसवून चीनने तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा, पण अवघ्या काही मिनिटात भारताच्या लढाऊ विमानांनी या हेलिकॉप्टरर्स चा पाठलाग सुरू केल्यानंतर चिनी हेलिकॉप्टरर्सना आपली दिशा बदलावी लागली होती. लडाख तसेच भारताच्या अन्य सीमा भागात घुसखोरी करणाऱ्या चिनी जवानांना भारतीय सैनिकांनी रोखून धरले आहे. तरीही चीनने यावर आक्रमक प्रतिक्रिया देण्याचे टाळून भारताबरोबरील सीमेवर सौहार्द व सलोखा कायम ठेवण्याची भाषा वापरली आहे. भारतावर दबाव वाढवण्याचा चीनचा प्रयत्न असला तरीही चीन यावेळी भारताशी थेट संघर्ष करायला तयार होणार नाही असे स्पष्ट मत भारताचे माजी लष्करी अधिकारी व्यक्त करीत आहेत. भारत-चीन सीमेवर दोन्ही देशाच्या लष्कराकडून एकही गोळी झाडली जात नाही, याचाच अर्थ दोन्ही देशांना युद्ध नको आहे असा होतो, असा दावा भारताचे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्लेषक करीत आहेत.

तरीही चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या लष्कराला दिलेले हे आदेश आपल्या विरोधात खड्या ठाकलेल्या सर्वच देशांना इशारा देण्यासाठीच असल्याचे संकेत मिळत आहेत. सर्व देशांनी मिळून दडपण टाकले तरीही चीन माघार घेणार नाही, प्रसंगी लष्करी संघर्षासाठीही तयार आहे असा संदेश राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना द्यायचा आहे. त्याचवेळी चीनमध्ये युद्धज्वर पसरवून कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात आलेले अपयश, ढासळती अर्थव्यवस्था याकडून दुसरीकडे लक्ष वळविणे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासाठी सोईचे ठरू शकते. यामुळे चीनच्या सत्तेवरील त्यांची पकड अधिक मजबूत होऊ शकते. यासाठीच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला हे आदेश दिल्याचे दिसत आहे.

leave a reply