‘अलिबाबा ग्रुप’वरील कारवाईनंतर चिनी कंपन्यांना २०० अब्ज डॉलर्सहून अधिक फटका

बीजिंग – चीनच्या सत्ताधारी राजवटीने जगातील सर्वात मोठी ‘ई-कॉमर्स’ कंपनी म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘अलिबाबा ग्रुप’विरोधात कारवाईची व्याप्ती वाढविण्याचे संकेत दिले आहेत. या वृत्ताने चीनच्या शेअरबाजारात जबरदस्त खळबळ उडाली असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना २०० अब्ज डॉलर्सहून अधिक फटका बसला आहे. आर्थिक नुकसान झालेल्या कंपन्यांमध्ये ‘टेन्सेंट होल्डिंग’ व ‘जेडी डॉट कॉम’ यासारख्या आघाडीच्या कंपन्यांचाही समावेश आहे.

‘अलिबाबा ग्रुप’

चीनची मध्यवर्ती बँक ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ने रविवारी एक निवेदन प्रसिद्ध करून जॅक मा यांच्या ‘अलिबाबा ग्रुप’ व ‘अँट ग्रुप’ या कंपन्यांविरोधात कारवाईचे संकेत दिले. ‘अँट ग्रुप’ने फक्त ‘पेमेंट सर्व्हिस’ क्षेत्रापुरते आपले व्यवहार मर्यादित ठेऊन इतर उद्योगांमधून बाहेर पडावे, असे निर्देश ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ने दिले आहेत. त्यापूर्वी गेल्या आठवड्यात चीनच्या ‘स्टेट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर मार्केट रेग्युलेशन’ या सरकारी यंत्रणेने ‘अलिबाबा ग्रुप’च्या मुख्यालयावर धाड टाकली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ५०० अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्य असणार्‍या आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वाचे प्रतीक असणार्‍या कंपनीवर झालेल्या या कारवाया खळबळ उडविणार्‍या ठरल्या. चीनच्या शेअरबाजारांमध्ये याची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून गुंतवणुकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे शेअर्स दोन ते आठ टक्क्यांनी कोसळले असून त्यांना २०० अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

‘अलिबाबा ग्रुप’चिनी अब्जाधीश जॅक मा यांच्या कंपन्यांवर झालेली ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. गेल्या महिन्यात जॅक मा यांनी चीनमधील बँकिंग नियंत्रक यंत्रणा तसेच मोठ्या बँकांच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे वक्तव्य केले होते. बँका व संबंधित यंत्रणा या क्षेत्रात नाविन्यपूर्ण गोष्टी स्वीकारण्यास तसेच धोका पत्करण्यास तयार नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची किंमत ‘अँट ग्रुप’ला मोजणे भाग पडले. या कंपनीकडून शांघाय व हाँगकाँगच्या शेअरबाजारात दाखल होणारा अब्जावधी डॉलर्स मूल्याचा ‘आयपीओ’ रद्द करावा लागला होता.

त्यापाठोपाठ झालेली नवी कारवाई चीनमधील खाजगी क्षेत्र व सत्ताधारी राजवटीतील तणाव ऐरणीवर आणणारी ठरली आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीला देशातील सर्व क्षेत्रांमध्ये आपले नियंत्रण हवे असून त्याला आव्हान ठरतील असे घटक वरचढ झालेले नको आहेत. त्यामुळे जॅक मा यांच्यासारख्या उद्योजकाचा वाढता प्रभाव चीनच्या सत्ताधार्‍यांना चांगलाच खटकणारा ठरला असून नवी कारवाई त्यांना रोखण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे.

leave a reply