‘एजिंग पॉप्युलेशन’वर तोडगा काढण्यासाठी चीनमधील दांपत्यांना तीन मुलांची परवानगी

बीजिंग – वृद्ध नागरिकांची वाढती संख्या व घटता जन्मदर यावर तोडगा काढण्यासाठी चीनने विवाहित जोडप्याला तीन अपत्यांची परवानगी दिली आहे. सोमवारी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने याची घोषणा केली. चीनमधील ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या जागतिक अर्थव्यवस्थेतील ‘सप्लाय चेन’(उत्पादनांच्या पुरवठ्याची साखळी) तसेच वित्तीय क्षेत्रासाठी मोठा धक्का देणारी ठरेल, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर कम्युनिस्ट राजवटीचा निर्णय लक्ष वेधून घेणारा ठरतो.

‘एजिंग पॉप्युलेशन’या महिन्याच्या सुरुवातीला चीनमधील जनगणनेची माहिती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, चीनची लोकसंख्या 1.411 अब्जावर पोहोचली असून त्यातील 26.4 कोटी नागरिक 60 वर्षांहून अधिक वयोगटाचे आहेत. वृद्धांची संख्या वाढत असतानाच सलग चार वर्षे चीनमधील लोकसंख्यावाढीचा दर घसरत आहे. 2020 साली चीनमध्ये जन्म घेणार्‍यांची संख्या 15 टक्क्यांनी घटली असून जन्मदर कमी होण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे. 2020 सालची आकडेवारी 1950 सालानंतरची नीचांकी पातळी असल्याचेही सांगण्यात आले होते.

‘एजिंग पॉप्युलेशन’चीनमध्ये सातत्याने लोकसंख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी 1979 साली तत्कालिन कम्युनिस्ट राजवटीने ‘वन चाईल्ड पॉलिसी’ लादली होती. या धोरणामुळे गेल्या साडेतीन दशकात चीनने आपल्या लोकसंख्येत 40 कोटींची भर पडण्यापासून रोखण्यात यश मिळविल्याचे दावे करण्यात येतात. मात्र त्याचे विपरित परिणामही समोर येण्यास सुरुवात झाल्यानंतर 2016 साली हे वादग्रस्त धोरण रद्द करण्यात आले. 2016 सालापासून चीनमधील जोडप्यांना दोन मुलांची परवानगी देण्यात आली होती.

मात्र या निर्णयाने चीनच्या लोकसंख्येत विशेष बदल झालेला नसून उलट जन्मदर सातत्याने घटत असल्याचेच समोर येत आहे. 2016 साली चीनमध्ये एक कोटी, 80 लाख मुलांचा जन्म झाला होता. 2020 साली हीच संख्या एक कोटी, 20 लाखांपर्यंत खाली आली. चिनी जनतेच्या मानसिकतेत बदल झालेला नसल्याचे घटत्या जन्मदरावरून दिसून आले होते. त्यामुळे दोन मुलांसंदर्भातील धोरण फसल्याचे चीनमधील विश्‍लेषकच सांगत आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर तीन अपत्यांचे धोरण यशस्वी ठरेल का, यावरही शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

‘एजिंग पॉप्युलेशन’सोमवारच्या निर्णयाचे चीनच्या प्रसारमाध्यमांनी स्वागत केले. मात्र सोशल मीडियावर उमटणारा सूर निराळा होता. सध्याच्या काळात खर्च वाढत असताना तीन अपत्यांची जबाबदारी कशी पार पाडणार, अशी प्रतिक्रिया नेटिझन्सकडून उमटली. गेल्या दशकभरात चीनच्या शहरातील लोकसंख्येचे प्रमाण वाढले असून बहुतांश शहरी जोडप्यांमध्ये एकच मूल ही संकल्पना रुजली आहे. सोशल मीडियावर व्यक्त झालेला सूर त्याचेच प्रतिबिंब असल्याचे मानले जाते.

चीनची ओळख आजही ‘जगाची फॅक्टरी’ अशी आहे. त्यासाठी एक मुख्य घटक स्वस्तात उपलब्ध होणारे मुबलक मनुष्यबळ हा होता. मात्र जन्मदर व पर्यायाने लोकसंख्येत घट होत राहिल्यास चीनमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार नाही, अशी चिंता काही अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पुढील काही वर्षात चीन सात कोटी इतक्या प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ गमावणार आहे, असे ‘एएनझेड’ बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ रेमंड येऊंग यांनी नुकतेच बजावले होते.

leave a reply