कोरोनाच्या संकटकाळातही आठ प्रमुख उद्योगक्षेत्रांच्या उत्पादनात विक्रमी वाढ

उत्पादनात विक्रमी वाढनवी दिल्ली – देेशात कोरोनाच्या संकटात लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आर्थिक उलाढालींवर परिणाम झाला आहे. मार्च महिन्यात संपलेल्या आर्थिक वर्षात उणे सात टक्के विकासदर नोंदविण्यात आला होता. असे असले तरी देेशातील आठ प्रमुख उद्योगक्षेत्रांच्या एप्रिल महिन्यातील उत्पादनात मोठी वाढ झालेली पहायला मिळत आहे. या उद्योगक्षेत्रांच्या उत्पादनात तब्बल 56.1 टक्क्यांची वाढ झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. उत्पादनामधील ही वाढ उत्साह वाढविणारी आणि 2021-22 या आर्थिक वर्षात भारताच्या विकासदराच्या गती कशी राहिल, हे दर्शविणारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार नैसर्गिक वायु, रिफायनरी प्रॉडक्ट, पोलाद, सिमेंट आणि वीज उत्पादन क्षेत्राच्या उत्पादनात अनुक्रमे 25 टक्के, 30.9 टक्के, 400 टक्के, 548 टक्के, आणि 38.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात या पाच क्षेत्रांमध्ये उणे 19.9 टक्के, उणे 24.2 टक्के, उणे 82.8 टक्के, उणे 85.2 टक्के आणि उणे 22.9 टक्के इतका उत्पादन दर घसरला होता.

एप्रिल महिन्यात कोळसा आणि खत निर्मिती क्षेत्रातही वाढ झाली आहे. केवळ कच्च्या तेलाचे उत्पादन 2.1 टक्क्यांनी घटले आहे. दरम्यान यावर्षी भारताचा विकास दर 10 ते 12 टक्के राहिल असे अहवाल प्रसिद्ध होत आहेत. यावर्षी भारत कोरोनाच्या संकटानंतरही जगात सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा देश ठरणार असल्याचे दावे विश्‍लेषक करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आठ प्रमुख उद्योग क्षेत्राच्या उत्पादनात झालेली वाढ लक्षवेधी ठरत आहे.

leave a reply