चीनच्या लढाऊ विमानाचे अमेरिकेच्या टेहळणी विमानाजवळून धोकादायकरित्या उड्डाण

टेहळणी विमानाजवळूनवॉशिंग्टन – साऊथ चायना सीच्या क्षेत्राबाबत चीन आंतरराष्ट्रीय नियमांची पर्वा करीत नसल्याचा आरोप अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने केला आहे. आठवड्यापूर्वी येथील हवाई क्षेत्रातून टेहळणी करणाऱ्या अमेरिकेच्या विमानाजवळून अवघ्या सहा मीटर अंतरावरुन चीनच्या लढाऊ विमानाने उड्डाण केले. चिनी वैमानिकाच्या या धोकादायक कसरतीमुळे दोन्ही विमानांमध्ये टक्कर घडून मोठे संकट उभे राहिले असते, असा दावा अमेरिकेने केला. या वर्षभरात चीनच्या हवाईदलाने परदेशी विमानांजवळून धोकादायक प्रवास करण्याची ही तिसरी घटना ठरते.

टेहळणी विमानाजवळून21 डिसेंबर रोजी अमेरिकन हवाईदलाचे ‘आरसी-135’ या टेहळणी विमान साऊथ चायना सीच्या क्षेत्रात टेहळणीच्या मोहीमेवर होते. नियोजित वेळापत्रकारानुसार आणि आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर करून अमेरिकेचे विमान साऊथ चायना सीच्या हवाई क्षेत्रातील टेहळणी संपविण्याच्या तयारीत होते. पण अमेरिकेचे विमान तैवानच्या क्षेत्राजवळ पोहोचत असतानाच चीनच्या ‘जे-11’ लढाऊ विमानाने अतिशय वेगाने धोकादायक प्रवास सुरू केला.

टेहळणी विमानाजवळूनएका क्षणाला चीनचे लढाऊ विमान अमेरिकन टेहळणी विमानाच्या सहा मीटर अर्थात 20 फूट अंतरापर्यंत पोहोचले होते. चिनी वैमानिकाचे सदर धोकादायक उड्डाण आंतरराष्ट्रीय हवाई नियमांचे उल्लंघन करणारे असल्याची टीका अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने केली. अमेरिका इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय हवाईहद्द तसेच हवाई नियमांचे पालन करतो व इतरही देशांकडून हीच अपेक्षा असल्याचे सांगून अमेरिकेने चीनला टोला लगावला.

याआधी जून महिन्यात चीनच्या लढाऊ विमानांनी कोरियाच्या हवाईहद्दीत कॅनडाच्या विमानाजवळून धोकादायक उड्डाण केले होते. तर त्याआधी एप्रिल व मे महिन्यात चीनच्या विमानांनी असाच प्रकार ऑस्ट्रेलियाच्या टेहळणी विमानाच्या बाबतही केला होता. या दोन्ही देशांनी चीनवर जोरदार ताशेरे ओढले होते.

दरम्यान, चिनी वैमानिकाच्या एका चुकीमुळे दोन्ही विमानांमध्ये टक्कर घडली असती व याचे दूरगामी परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर झाले असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या उलथापालथी झाल्या असत्या, असा दावा पाश्चिमात्य विश्लेषक करीत आहेत. त्यामुळे साऊथ चायना सी तसेच इतर हवाई क्षेत्रातील चिनी विमानांच्या या धोकादायक उड्डाणाकडे अतिशय गांभीर्याने पहावे, असे आवाहन हे विश्लेषक करीत आहेत.

leave a reply